कांद्याला भाव नाही, तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, कांदा-कापसाला भाव नसल्याने शेतकरी चिंतेत
बोरखेड(ता. बीड) येथील संभाजी अर्जुन अष्टेकर (वय २३ वर्षे) या तरूण शेतकऱ्याने कांद्याला भाव नाही म्हणून सोमवारी आत्महत्या केली. रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेला असता परतला नसल्याने सकाळी शेतात शोध घेतला. तर आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या परिस्थितीत मृतदेह आढळला.
संभाजी कुटुंबातील एकमेव कर्ताधर्ता होता. वयोवृद्ध वडील अर्जुन लक्ष्मण अष्टेकर, आई वनमाला, मोठा भाऊ शिवाजी भोळसर, मोठी बहीण सोनाली वनकुदरे, तिचा मुलगा मंदार वय ९ वर्षे भोळसर असून,मुलगी ऋतुजा वय ७ वर्षे यांची जबाबदारी संभाजी यांच्यावर होती. पाच एकर जमिनीत तीन एकर कांदा लावण्यात आला होता. भाव नसल्यामुळे संभाजी चिंतेत असल्याचे त्याचे वडील अर्जुन अष्टेकर यांनी सांगितले. जवळपास साडेतीन लाख रूपये कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले. लिंबागणेश पोलिस स्टेशनचे जमादार सचिन डिडूळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तलाठी बाळासाहेब वनवे यांनी घरी भेट दिली. लिंबा गणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
—सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण
नापिकी तसेच अतिवृष्टी आदी अस्मानी संकटांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच सुलतानी संकटाची त्यात भर पडली असून कांद्याला हमीभाव न देणे हे सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण होऊन बसले आहे.कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी सहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने केलेला खुनच आहे, असे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.