ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे निधन, महेश कोठारे यांचे वडील
ज्येष्ठ रंगकर्मी, चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे शनिवारी (२१ जानेवारी) वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले.
ज्येष्ठ रंगकर्मी, चित्रपट निर्माते अंबर कोठारे (वय ९६) यांचे शनिवारी (२१ जानेवारी) वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. कोठारे यांच्या पार्थिवावर बोरिवली येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी जेनमा, मुलगा प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे, नातू आदिनाथ कोठारे असा परिवार आहे.
मराठी नाटक आणि चित्रपटाच्या ऐंशीच्या दशकात अंबर कोठारे यांचे सक्रिय योगदान होते. १४ एप्रिल १९२६ रोजी मुंबईत जन्मलेल्या कोठारे यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. गिरगावात रस्त्यावर किरकोळ वस्तू विकण्याचे कामही त्यांनी केले होते. शिक्षण पूर्ण करून त्यांनी ‘ब्रिटिश बॅंक ऑफ दि मिडल इस्ट’बॅंकेत नोकरी केली. बॅंकेचे भारतातर्फे प्रतिनिधीत्व करण्याचीही संधी त्यांना मिळाली होती. अंबर कोठारे यांनी नोकरी सांभाळत नाटकाची आवड जपली होती. प्रायोगिक रंगभूमीवर त्यांनी दीर्घकाळ काम केले.
‘इंडियन नॅशनल थिएटर’ (आयएनटी) या संस्थेच्या मराठी विभागाचे ते पहिले सचिव होते. या संस्थेतर्फे बरीच नाटके रंगभूमीवर सादर झाली. ‘झोपी गेलेला जागा झाला’या नाटकाचे त्यांनी शेकडो प्रयोग सादर केले होते. काही नाटकांमध्ये कोठारे यांनी अभिनय केला होता. प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या बालकलाकार ते दिग्दर्शक या प्रवासात अंबर कोठारे यांचे योगदान होते. महेश कोठारे यांचे पदार्पण असलेला ‘धुमधडाका’चित्रपटाच्या निर्मितीत अंबर कोठारे यांचा सहभाग होता. महेश कोठारे यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ‘दे दणादण’या चित्रपटामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती.
अंबर कोठारे, महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे अशा तीन पिढ्यांनी मराठी कला क्षेत्रात योगदान दिले आहे. अंबर कोठारे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करीत अनेक कलाकारांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.