मराठा समाजात उद्योजक घडविण्यास महामंडळ कटिबद्ध – नरेंद्र पाटील
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचा घेतला आढावा
औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : शेतकरी कुंटुबातील मराठा तरुणांना नवनवीन उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महामंडळ नेहमीच प्रयत्न करीत आहे. मराठा समाजामधून देखील तरुण उद्योजक घडावेत यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कटीबद्ध आहे. मराठा समाजाची आर्थिक प्रगती साध्य करण्यासाठी वैयक्तिक व गट कर्ज व्याज परतावा योजना राबविल्या जात असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कामकाजाचा आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, जिल्हा अग्रणी बँकेचे अध्यक्ष मंगेश केदार, कौशल्य व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडाळाचे प्रवीण पाटील, समाधान सुर्यवंशी, पूजा तांबेकर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे अनिलकुमार दाबशेडे, देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे व सहकारी बँकेचे शाखा व्यवस्थापक, लाभार्थी व संघटनेचे प्रतिनिधी यांची या बैठकीस उपस्थिती होती.
राष्ट्रीयकृत बँकानी प्रलंबित प्रकरणे मंजुर करण्यामध्ये आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच लाभार्थ्यांनी कर्जव्याज परतावा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याचे ‘सिबील’ अहवाल निर्दोष कसा राहील याची काळजी घ्यावी. महामंडाळाचे कर्ज प्रस्ताव ग्रामीण भागातील तरुणांचे अधिक असल्याने या योजनेच्या माहितीचे बँनर लावावे व जास्तीत जास्त तरुणांना उद्योजक होण्यासाठी मदत करण्याचे नरेंद्र पाटील यांनी आवाहन केले.
बँकातील कर्ज प्रस्ताव मंजूरीतील दलाल अथवा मध्यस्थी निर्मूलन करुन खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्याची जबाबदारी बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी पार पाडावी. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची वयोमर्यादा 18 ते 60 अशी वाढवण्यात आली असून 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा वाढवण्यात आली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
महिलांसाठी कर्जसुविधा उपलब्ध करुन देण्याबरोबर बँक कर्मचारी, लाभार्थी आणि महामंडळ यांचा संयुक्त मेळावा आयोजन करण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या सुचनाही त्यांनी बँक प्रतिनिधीना केल्या. जिल्ह्यात दिलेला पाच हजार लक्षांक पूर्ण करण्यासाठी सर्व बँकानी महामंडळाच्या कर्जव्याज परताव्याची माहिती ग्रामीण भागात बँकेच्या शाखेमार्फत देण्यात यावी अशी सूचना पाटील यांनी बैठकीत उपस्थित बँक प्रतिनिधीना केली.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज प्रकरणाचे बँकेचे (NPA) होण्याचे प्रमाण अत्यल्प असून लवकरच या योजनेची जाणिव जागृती बँक, प्रसारमाध्यमे,समाजमाध्यमे तसेच डिजीटल स्क्रीनद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगितले.
मराठा समाज आत्मसन्मानाने जगणारा असल्याने बँकेचे कर्ज बुडितेचे प्रमाण अत्यल्प असल्याचे जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी सांगितले.
जिल्ह्यात अधिकधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जाणिवजागृती, बँकाचे समन्वयन आणि लाभार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने काही कालावधीतच लक्षांक पूर्ण करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना दिली.