विरोधानंतर अखेर ‘हर हर महादेव’चे शो रद्द
शिवकालीन इतिहासाची तथ्यहीन मांडणी केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शो पुन्हा सुरू केला. राज्यभर मंगळवारी ठिकठिकाणी चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. संभाजी ब्रिगेडसह इतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्याने चित्रपटगृहचालकांनी ‘हर हर महादेव’चे शो रद्द करीत असल्याचे जाहीर केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला उणेपण आणणारी मांडणी करीत मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याचा आरोप माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. त्यांच्या भूमिकेवर विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी ऐतिहासिक चित्रपटांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात विवियाना मॉल येथे ‘हर हर महादेव’चा खेळ बंद पाडला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अमेय खोपकर यांनी आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी येथे महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
संभाजी ब्रिगेड, स्वराज संघटना यांनी इतिहासाचे चुकीचे चित्रण करणाऱ्या चित्रपटांना विरोध केला आहे. औरंगाबाद शहरात संभाजी ब्रिगेडने चित्रपटाचे शो बंद पाडले. चित्रपटगृह व्यवस्थापनाने संमती देत शो रद्द करीत असल्याचे सांगितले. राज्यभरात हा वाद धुमसत असताना आमदार आव्हाड यांनी आपली भूमिका फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केली आहे. त्यातून महाराष्ट्राला काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. ही पोस्ट राज्यभर प्रचंड व्हायरल झाली असून त्याची चर्चा सुरू आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोपावर खुलासा केला आहे. सेन्सॉरला सर्व ऐतिहासिक पुरावे दाखवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर चित्रपटाला विरोध वाढल्याने शो रद्द झाले आहेत. आव्हाड यांचे मुद्दे चर्चेत आले आहेत.