इतिहासाची मोडतोड करणारा “हर हर महादेव” चित्रपट बंद करा – संभाजी ब्रिगेड

नुकताच प्रदर्शित झालेला ‘हर हर महादेव’ आणि आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटांना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कडाडून विरोध केला आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन संभाजी राजे यांनी इतिहासाची मोडतोड करणाऱ्या चित्रपटांना रोखणार असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा आदी संघटनांनी या चित्रपटांना जोरदार विरोध केला आहे. पिंपरी येथे ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. इतिहासाचे विकृतीकरण करून गल्लाभरू धंदे निर्माते दिग्दर्शक करीत असल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. समाज माध्यमात या चित्रपटांच्या विरोधात जोरदार ट्रेंड सुरू आहे. या चित्रपटातील कोणत्या गोष्टी शिवप्रेमींना खटकल्या याची सविस्तर कारणे संभाजी ब्रिगेडने दिली आहेत.

इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा “हर हर महादेव” चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड बंद पाडेल, असा इशारा प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर व केंद्रीय कार्यकारणीची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे.शूरवीरांच्या कर्तृत्वाशी खोडसाळपणा केला आहे. इतिहासाची मोडतोड करून मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे, असे संघटनेने म्हटले आहे. छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे, ती पण हास्यास्पद आहे. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलिता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे जेधे यांना शिपाई करणे आहे. बांदल देशमुख खुळ, व्यभिचारी दाखवली आहेत. वारंवार मराठी मराठी शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ या बाजीप्रभूचा सल्ला घेताना दाखवल्या आहेत. छत्रपती होतील ना राजे ?? अफजलखान क्रूर आहे हे बाजीप्रभू सल्ला देताना दाखवले आहे. म्हणजे छत्रपती यांच्या प्रगल्भ विचारांची चेष्टा केली आहे. छत्रपती यांना अफजलखानाने जिरेटोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतीवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला, असे खोटे दाखवले आहे. शिवा काशिदला बाजीप्रभूंनी शोधून आणले असं खोटं दाखवलं आहे. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले. त्यांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन मारले असं दाखवले आहे.

आम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी द्यावे, असे आव्हान संभाजी ब्रिगेडने दिले आहे.
१) ट्रेलरमध्ये मराठी शब्दांचा वापर वारंवार घेण्यात आला, मराठा साम्राज्य म्हणायची लाज वाटत होती का ?
२) हा चित्रपट कोणत्या समकालीन साधनांवर आधारित आहे?
३) बारा मावळमध्ये बाजीप्रभू देशपांडे हेच एकमेव लढाऊ होते का..?
४) बांदलांच्या कारभारात एक पाटील ६० मुलीबाळींवर बलात्कार करतो आणि बांदल त्याला पाठीशी घालतात.. हे कुठल्या आधारे दाखवले..?
५) छत्रपती शिवाजी महाराजांनी समेट करण्याच्या बाबतीत बांदलांशी केलेल्या पत्रव्यवहारात बाजीप्रभू देशपांडे यांच्या उल्लेख आढळतो का…?
६) चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभू व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाली होती..?
७) जेधे आणि बांदल घराण्याचे वैर होते पण,बकरी चोरण्यावरून बांदल- जेधे एकमेकांची मुंडकी मारायचे..? इतके विकृत स्वरूप होते का…?
८) अफजल खानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू देशपांडे तिथे होते का..?
९) अफजल खान डावखुरा होता की उजवा होता हे शिवाजी महाराजांना खाजगीत सांगणारा बाजीप्रभू हा कुठल्या आधारे दाखवला..?
१०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा काही राजनैतिक शिष्टाचार असतील. हे सुद्धा सध्याच्या फालतू चित्रपट दिग्दर्शकांना कळत नसावे का..? उठसूठ कोणीही सरदार शिवाजी महाराजांना खाजगीत जाऊन काहीही सांगू शकत होते का..? हे कोणत्या आधारे दाखवता..?
११) छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचे वर्णन उपलब्ध असतानासुद्धा, पांचट आणि नकटा सुबोध भावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भेटला का..?
१२) सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मात्र शुद्ध मराठी हे कोणत्या आधारावर..? १३) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला…? ज्या गोष्टी प्रत्यक्षात आणि तर्कसुसंगत चुकीच्या आहेत त्या तुम्ही मोठ्या पडद्यावर दाखवता ? यातून तुम्हाला काय साध्य करायचे आहे..?
१४) मराठी हा शब्द कुठल्या इतिहासाच्या साधनात सापडतो..?आणि असे बरेच काही प्रश्न…
त्यामुळे या चित्रपटाचा जाहीर निषेध. हा चित्रपट तात्काळ बंद करा, असे संभाजी ब्रिगेडने म्हटले आहे.

 

“वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाची संहिता ‘संभाजी ब्रिगेड’ला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. अन्यथा, हा चित्रपट चालू देणार नाही.”

डॉ.शिवानंद भानुसे
प्रदेश प्रवक्ते, संभाजी ब्रिगेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *