शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये ‘सन्मान निधी’

पिकांना भाव नसला तरी शेतकऱ्यांना अनुदानाचे गाजर, अर्थसंकल्पात तरतूद

राज्य सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकरी आणि महिलांसाठी विशेष योजना लागू केल्या आहेत. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना झुकते माप देण्यात आले आहे. त्यानुसार शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगारनिर्मिती, रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या पंचामृतावर अर्थसंकल्प आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. कांदा, कापूस या पिकांना भाव नसल्यामुळे राज्यभरात आंदोलने सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा केल्या. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येणार आहे. तसेच अवघ्या एक रुपयात पीक विमा योजनेचा फायदा घेता येणार आहे, अशी घोषणा फडणवीस यांनी सभागृहात केली.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देत आहेत. त्यात राज्य सरकारने आणखी सहा हजार रुपयांची भर घातली आहे. शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहे. जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार आहे. राज्य सरकारकडून नवीन योजनेसाठी सात हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार प्रोत्साहनपर अनुदान देणार आहे. शेततळे, ठिबक सिंचन योजनेची घोषणाही करण्यात आली.

—विरोधी पक्षांची टीका
सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील प्रश्नांवर म्हणणे मांडत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी नाफेडच्या कांदा खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करीत त्यांनी सभागृह दणाणून टाकले. नाफेडने कांदा खरेदी सुरू केल्याचे शिंदे म्हणाले. तर कांदा खरेदी सुरु झाली नसून शेतकरी वाट पाहत आहेत. शेतमालाच्या किंमती घसरल्या असल्याने शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करा, अशी मागणी पवार यांनी केली. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतीचे विमा कंपन्यांनी तातडीने पंचनामे करावे, अशी मागणीही करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *