Trending

बॉक्स ऑफिसवर ‘वेड’ची भरघोस कमाई Ved marathi movie

मराठी चित्रपट सुपरहिट

रिल लाइफ आणि रिअल लाइफमध्ये ‘मेड फॉर इच अदर’ अशी ज्यांची ओळख आहे, त्या रितेश देशमुख – जेनेलिया डिसूझा या जोडीचा ‘वेड’ चित्रपट सुपरहिट झाला. या जोडीला प्रत्यक्ष पाहणं लोकांना जेवढं आवडतं तेवढंच रूपेरी पडद्यावर पाहणंही आवडतं हे पुन्हा सिद्ध झालं. एकवीस दिवस आणि ५० कोटींची भरघोस कमाई.

आणखी काय हवं मराठी सिनेमाला ? गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी सिनेमा अपवाद वगळता सपाटून आपटत होता. मराठी सिनेमाला थिएटर शो मिळत नसल्याची ओरड सुरू होती. नावाजलेल्या दिग्दर्शक, कलाकारांचे चित्रपट फ्लॉप झाले होते. या सगळ्या चर्चेला ‘वेड’मुळं पूर्णविराम मिळाला. इथून पुढं मराठी सिनेमाची गाडी सुसाट धावणार अशी अपेक्षा आहे.

कारण अनेक दिवसांनी मराठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडला. त्यात फॅमिली क्राउड सर्वाधिक आहे. सहकुटुंब मराठी सिनेमा पाहण्याचं प्रमाण महाराष्ट्रात कमी आहे. साउथ इंडस्ट्री याच प्रेक्षकांनी मोठी केलीय. मराठी सिनेमा म्हणजे वाह्यात विनोद, लुटूपुटूच्या लढायांचे ऐतिहासिकपट, तकलादू सामाजिक विषय, शूटिंग केलेलं नाटक अशीच प्रेक्षकांची धारणा आहे. किमान ‘वेड’ चित्रपटानं ही धारणा बदलण्याचं काम केलं. तिसऱ्या आठवड्यातही हाउसफुल्ल चालावा असं काय आहे वेड चित्रपटात ? रितेश देशमुखचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट. माजिली या तेलुगू सिनेमाचा हा रिमेक. त्यावरुन काहीजणांनी टीकासुद्धा केली. पण सिनेमाला मराठीपण देण्याचं काम रितेशनं परफेक्ट केलंय.

सिनेमा कुटुंबप्रधान आहे. प्रेम, लग्न, विश्वास, नात्याची गुंतागुंत अन् प्रेमाचा विजय. या साध्या सरळ स्टोरीला रितेशनं खुबीनं पडद्यावर आणलंय. प्रेक्षकाला दोन तास गुंतवून ठेवण्यासाठी सगळ्या फिल्मी ट्रिक वापरल्या आहेत. रितेशचा भावूक अभिनय प्रेक्षकांना जितका आवडला त्यापेक्षा अधिक जेनेलियाची समंजस भूमिका आवडली. सिनेमाच्या मध्यवर्ती जेनेलिया आहे. तिनं प्रगल्भ अभिनयाचं दर्शन घडवलं. तेही सिनेमात अनेक दिवसांनी कमबॅक केल्यानंतर. हा सुखद धक्का ठरला. जिया शंकर, अशोक सराफ, शुभंकर तावडे यांच्या भूमिकाही जमेच्या बाजू आहेत. सिनेमा सुपरहिट झाला. अजय अतुल यांचं संगीत जिकडं तिकडं गाजतय. सोशल मीडियावर रिल्सनी धमाल उडवलीय. रितेशचा सत्या, जेनेलियाची श्रावणी, जिया शंकरची निशा तरुण प्रेक्षकांची फेव्हरट आहेत. त्यांच्या नावानं सिनेमाचे शो हाउसफुल्ल आहेत. विशेष आकर्षण म्हणून सलमान खान आहे.

गाण्यांनी प्रेक्षकांनाही वेड लावलं. दुसऱ्या आठवड्यात ४० कोटी कलेक्शन करुन ‘वेड’नं बॉलिवू़डलाही दखल घ्यायला लावली. सिंगल स्क्रिन थेटर ते मल्टिप्लेक्स…असा सर्वत्र फक्त ‘वेड’ दिसतोय. तिसऱ्या आठवड्याच्या अखेरीस ‘वेड’नं ५० कोटींचा टप्पा पार केला आणि सर्वाधिक कमाई करणारा दुसऱ्या क्रमांकाचा मराठी चित्रपट ठरला. पहिला क्रमांक अर्थातच ‘सैराट’चा आहे. मराठी चित्रपटाविषयी नकारात्मक वातावकरण असताना, थिएटरची संख्या घटत असताना आणि साउथच्या सिनेमाचा गाजावाजा वाढत असताना ‘वेड’ सुपरहिट होणं इंडस्ट्रीसाठी मोठं यश आहे. प्रेक्षकांचं उदंड प्रेम पाहून रितेशनं ‘वेड’मध्ये खास आकर्षण म्हणून नवीन गाणं तिसऱ्या आठवड्यात आणलंय.

त्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला तर रेकॉर्डब्रेक कमाई होणार आहे. ‘वेड’मुळं काही गोष्टी स्पष्ट झाल्या. मराठी सिनेमाला ग्लॅमरस हिरोची गरज आहे, बजेट वाढवणं आवश्यक आहे, तरुणांना आवडेल असं संगीत हवंय, सिनेमाचं जोरदार प्रमोशन पाहिजे. कुणालाही दोन घटका करमणूक म्हणून पहावासा वाटेल असा चित्रपट पाहिजे. त्यात रितेश देशमुख यशस्वी ठरला आहे. प्रेक्षक मराठी सिनेमा पाहत नाही हा आरोप चुकीचा असल्याचं दिसलं.

कलात्मक सिनेमाचा मराठी समीक्षक आणि माध्यमात सर्वाधिक गाजावाजा असतो. पण अशा सिनेमापासून सामान्य प्रेक्षक दूर असतो. चित्रपट महोत्सवापुरत्या मर्यादित सिनेमाची सर्वदूर लोकप्रियता नसते. उलट तिकीट खिडकीवर हाउसफुल्ल होणाऱ्या सिनेमाची मराठी इंडस्ट्रीला जास्त गरज आहे. सुपरहिट होणारे सिनेमे धंदेवाईक आहेत, रिमेक आहेत, उथळ संगीत आहे, असे निराशेचे सूर काढणं विसंगत ठरतं. कारण आर्थिक समीकरण जुळलं तरच मराठी सिनेमा तग धरू शकतो. एका वेडच्या यशानं अख्खी मराठी इंडस्ट्री उत्साहीत झाली आहे. मराठी सिनेमाला शो देण्यासाठी थिएटर आग्रही आहेत.

हा सकारात्मक बदल केवळ व्यावसायिक यशानं घडतो. आता ‘वेड’नंतर काय अशी जाणकार प्रेक्षकांना उत्सुकता आहे. रितेश देशमुख नवीन सिनेमाची लवकरच घोषणा करील. सध्या तरी लावलंय लावलंय मला वेड लावलंय. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर लिहा. बाय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *