प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन
न्यूज टापू, औरंगाबाद
कामगार विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली आणून प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन बांधण्यात येणार आहे. कामगार भवनासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक ते दोन एकर जागा निवडण्याची सूचना कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बैठकीत केली आहे. या सुचनेमुळे गेली अनेक वर्षे रखडलेले कामगार भवन प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कामगार विभागाची विभागीय आढावा बैठक झाली. कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यांनी कामगारांचा घराचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्यात येणार असल्याचे सांगितले. गायरान, गावठाण आणि एमआयडीसीमध्ये असणाऱ्या जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत घरकुलासाठी अडीच लाख रुपये मिळतात. यात कामगार विभागाकडून प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख रुपये देऊन नोंदणीकृत कामगारांना घरकुल देण्याचा महत्वपूर्ण निर्णय खाडे यांनी जाहीर केला.
–कामगार नोंदणी एक रुपयात
कामगार नोंदणी करण्यासाठी २५ रुपये नोंदणी शुल्क होते. शुल्क कमी करुन आता केवळ एक रुपयात कामगार नोंदणी करण्यात येणार आहे. बालमजुरी निर्मुलन शासनाचे धोरण आहे. विभागात बालमजुरी निर्मुलन करण्यासाठी नियमित सर्वेक्षण करण्यात येईल. ज्या जिल्हयात बालकामगार आढळतील तिथे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे खाडे यांनी सांगितले.