शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणुकीत विजय, अंधेरीत ‘मशाल’ पेटली
अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा ६६ हजार ५३० मतांनी विजय झाला. या निवडणुकीत ‘नोटा’ला १२ हजार ७७८ (कुणीही पसंत नाही) अशी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते मिळाली आहेत. शिवसेनेला मतदान करण्यापेक्षा ‘नोटा’ला मतदान करा, असा प्रचार भाजपने केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. ‘नोटा’ची मतं म्हणजे मराठी आणि महाराष्ट्रद्वेषाची असल्याची टीका शिवसेना समर्थकांनी समाजमाध्यमांवर (#न्यूज टापू) केली आहे. या निवडणुकीमुळे ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट-भाजप यांच्यात राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे.
शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक पहिल्यापासून चर्चेत होती. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या निवडणुकीत उमेदवार देणार नसल्याचे जाहीर केले होते. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात बहुसंख्य मराठी मतदार आहेत. भाजपने ऐनवेळी पटेल यांची उमेदवारी मागे घेत ही भाजपची संस्कृती असल्याचे जाहीर केले होते. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पत्र लिहिल्यानंतर भाजपला उपरती झाल्याची टीका विरोधकांनी केली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. राज्यातील इतर तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपची संस्कृती कुठे गेली होती असा सवाल विरोधकांनी केला होता.
भाजपने माघार घेतल्यानंतर ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लटके यांना पाठबळ देत ताकदीने निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. धनुष्यबाण चिन्हाचा वाद कायम असल्याने मशाल चिन्हावर ही निवडणूक (#news tapu) लढवली गेली. मतदानासाठी मतदार बाहेर पडले नसल्याने निकालाबाबत उत्सुकता होती. हा निकाल रविवारी (६ नोव्हेंबर) जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीत ऋतुजा लटके यांनी आघाडी घेतली होती. १९ व्या फेरीअखेर लटके यांना विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या क्रमांकाची १२ हजार ७७८ मते ‘नोटा’ला मिळाली आहेत.
भाजपने मतदारसंघात ‘नोटा’ला मतदान करण्याचा प्रचार केला होता, असे आरोप शिवसेनेने केला आहे. ‘भाजपने ‘नोटा’ला पर्याय निवडण्याचे आवाहन केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ‘नोटा’ला झालेले मतदान ही भाजपला मिळालेली मते आहेत’, अशी टीका विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांनी केली आहे. ‘नोटा’ला मिळालेली मते मराठी आणि महाराष्ट्र द्वेषाची आहेत. मुंबईत मराठी टक्का कमी करण्यासाठी विरोधी पक्ष शिवसेनेच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत, अशी टीका समाजमाध्यमांवर शिवसेना समर्थकांनी केली आहे. या आरोपामुळे भाजप व शिंदे गटाची मुद्द्यावर कोंडी झाली आहे. त्यातून आगामी काळात राजकीय आखाडा अधिक रंगण्याची चिन्ह आहेत.