केशर आंब्याच्या निर्यातीवर पुन्हा आश्वासने

: केशर आंबा आणि मोसंबी फळपिकाची उत्पादन व निर्यातक्षमता वाढविण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी केशर आंबा व सिट्रस पार्क उभारणीच्या आढावा बैठकीत दिली. केशर आंबा क्लस्टर विकासासाठी कार्यालय, कोल्ड स्टोअरेज आणि नर्सरीसाठी जागा देण्याचे निर्देश भुमरे यांनी कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

औरंगाबादचा केशर आंबा आणि जालन्याची मोसंबी या फळांना भौगोलिक मानांकन मिळाले असल्याने या फळपिकाचे उत्पादन क्षेत्र वाढण्याबरोबरच निर्यात आणि प्रक्रिया उद्योगाबरोबराच संशोधन व शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सिट्रस इस्टेट पार्क उभारण्यात येत असल्याचे मंत्री भुमरे यांनी सांगितले.

मराठवाड्यात केशर आंबा लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. माळरान जमिनीवर रोहयो अंतर्गत खड्डे निर्मिती करुन आंब्याची लागवड केल्यास जिल्ह्यातील डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात फळपीक लागवड होऊ शकते. यासाठी शासनाच्या मालकीच्या पडिक जमिनीवर लागवड करण्याची सूचना आमदार हरीभाऊ बागडे यांनी केली.
करमाड येथील पणन मंडळाच्या जागेतील कोल्ड स्टोअरेज आंब्यासाठी उपलब्ध करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. औरंगाबाद येथे ‘आंबा महोत्सव’ आयोजित करुन शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्याचे नियोजन कृषि विभागाने करावे, असे सूचित केले. मराठवाड्यातील केशर आंबा इतर शहराबरोबरच परदेशात निर्यातक्षम करण्यासाठी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होण्यास सांगितले.

—सिट्रस इस्टेट पार्क उभारणी
पैठण तालुक्यात इसारवाडी येथे सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याबाबत जागेचा प्रस्ताव शासनास सादर झाला असून कृषी विभागाची मान्यता काही दिवसात येईल,असे भुमरे यांनी सांगितले. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना रोपवाटिका, अद्ययावत तंत्रज्ञान, विपणन तंत्र याचे प्रशिक्षण देऊन मोसंबीपासून अन्नपदार्थ तयार करण्याचे संशोधन सिट्रस इस्टेट पार्कमध्ये करण्यात येणार आहे. मराठवाड्यात मोसंबी उत्पादन वाढविण्याच्या हेतूने शासने सिट्रस इस्टेट पार्क उभारण्याचे निर्णय घेतल्याचा भुमरे यांनी सांगितले.
मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना नर्सरी, शेतकऱ्यांना प्रशिक्षणाची निवासी व्यवस्था, प्रयोगशाळा, तपासणी व निर्यातक्षम उत्पादन निर्मितीचे प्रशिक्षण व तंत्रज्ञानाची माहिती सिट्रस इस्टेट पार्कमध्ये उपलब्ध करुन देण्याच्या सुविधा असल्याची माहिती बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सिट्रस इस्टेट पार्क उभारणी बाबतच्या प्रस्तावाच्या त्रुटीची पूर्तता करुन सिट्रट इस्टेट पार्क सुरु करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची निर्देश पालकमंत्री भुमरे यांनी कृषी विभागाला दिले.

—-रमाई आवास योजनेचा आढावा
जिल्हयात रमाई आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या घरासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या प्रश्नाबाबत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. चित्तेपिपंळगाव येथे मंजूर घरांच्या बांधकामास गती देण्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचित केले. जुनी घरे नियमित करण्याबाबत तसेच ना विकास क्षेत्रातील घराबाबत शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पांडूरंग वाबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील यांच्यासह संबधित यंत्रणेचे अधिकारी रमाई आवास योजनेच्या आढावा बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *