सत्तार यांची भाषा म्हणजे खोके आणि सत्तेतून आलेला माज
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य अतिशय संतापजनक, खेदजनक आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांविरूध्द वाट्टेल ते बोला. आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, अशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना हमी दिली आहे का ?, अशी हमी दिली नसेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा त्वरीत राजीनामा घ्यावा अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी केली आहे.
खरे तर महाराष्ट्र पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाते. सध्याच्या सरकारमधील मंत्री अशी बेताल वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेने घाली घालत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून संसदेत सुप्रिया सुळे महिलांचे प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. महाराष्ट्रातील महिलांचा त्या देशपातळीवरील आवाज आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत सुप्रियाताईंना अनेक वेळा संसदरत्न म्हणून सन्मानित केले गेले. महिलांच्या सन्मानासाठी नेहमीच कार्यरत असलेल्या सुप्रिया सुळे यांना शरद पवार साहेबांच्या कन्या म्हणून सर्वच ओळखतात. मात्र त्यापुढे जाऊन स्वकर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या राजकारणात आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे, असे चव्हाण म्हणाले.
अशा व्यक्तीबद्दल बोलताना अब्दुल सत्तार यांची जीभ धजावलीच कशी?, एका जबाबदार मंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभते का?, त्यांची भाषा म्हणजे खोके आणि सत्तेतून आलेला माज आहे. महिला लोकप्रतिनिधीबद्दल एक जबाबदार मंत्रीच अशी भाषा वापरत असेल तर सामान्य महिलांच्या मानसन्मानाची अपेक्षा या सरकारकडून करायची तरी कशी? संस्कृती आणि हिंदुत्वाची भाषा करणार्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असली भाषा मान्य आहे का?, असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले आहेत. तसेच अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई सुळे यांची जाहीर माफी मागावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.