राज्यातील पाच हजार विद्यार्थ्यांना खंडपीठात दिलासा

भारतीय परिचर्या परिषदेने काढलेल्या दोन परिपत्रकांना औरंगाबाद खंडपीठात आव्हान

परिचर्या (परिचारक व परिचारिका) अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी वैद्यकीय शिक्षणासाठीच्या प्रवेश पात्रता परीक्षेतील (नीट) गुणांची अट प्रथमच लागू करण्यात आली. भारतीय परिचर्या परिषदेने काढलेल्या दोन परिपत्रकांना औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर बारावीच्या ४५ टक्के गुणांवर बी. एसस्सी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश न्या. रवींद्र घुगे व न्या एस.ए.देशमुख यांच्या खंडपीठाने दिले आहे. या निर्णयामुळे नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘नीट’द्वारे झालेले एक हजार २३६ प्रवेश कायम ठेवले आहेत. उर्वरित पाच हजार १६४ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया बारावीच्या ‘पीसीबी ग्रुप’ ४५ टक्के गुणांवर राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत दोन विद्यार्थ्यांनी अॅड. व्ही. डी. होन, अॅड. प्रल्हाद बचाटे व अॅड. अमरजितसिंग गिरासे यांच्यामार्फत व प्रायव्हेट नर्सिंग स्कूल्स अॅण्ड कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन व असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग कॉलेजकडून डॉ. बाळासाहेब पवार व डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी वरिष्ठ विधिज्ञ विनायक होन व अॅड. अश्विन होन यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या आहेत. भारतीय परिचर्या परिषदेने आठ एप्रिल २०२२ आणि सीईटी सेलने १७ ऑक्टोबर २०२२ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार परिचारक व परिचारिका या नर्सिंग (परिचर्या)) अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियम लागू केले. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परीक्षेमध्ये ११३ ते ११७ गुणांची अट लागू केली. त्याचा आधार घेत महाराष्ट्र सीईटी सेलनेही प्रवेश प्रक्रियेची यंत्रणा राबवली. परिणामी, यंदा पहिल्या फेरीत प्रवेश होऊ शकले नाही.

मागील वर्षीपर्यंत ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असली तरी गुणांची गरज नव्हती. शून्य गुण असले तरी प्रवेश मिळत असत. आता एमबीबीएस व बीएएमएसच्या धर्तीवर गुणांची निश्चिती ठरवण्यात आली आहे. या अटीचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम झाला आहे. परिपत्रकांच्या अटी गतवर्षीच्या बारावीची परीक्षा दिलेल्या मुलांसाठीही लागू करण्यापूर्वी सर्वोच्च संस्थेची परवानगी घ्यावी लागते, असे याचिकेत नमूद करण्यात आले.
आतापर्यंत केवळ बारावीच्या गुणांच्या आधारे परिचर्या (नर्सिंग) अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात असे. मात्र, भारतीय परिचर्या परिषदेने प्रथमच चार ऑगस्ट व १७ ऑक्टोबर रोजीच्या परिपत्रकाद्वारे ‘नीट’च्या गुणाआधारे अभ्यासक्रमास प्रवेश देण्याचे जाहीर केले.

दरम्यान, याचिकेवर खंडपीठात २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान सुनावणी झाली. ११ ऑगस्ट २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार २०२१ मध्ये बीएस्ससी नर्सिंग प्रवेशासाठी ‘नीट’ युजी परीक्षा सक्तीची नव्हती का ? असा प्रश्न न्यायालयाने केला. यासंदर्भात अभिप्राय मागितल्यानंतर भारतीय परिचर्या परिषदेने गुरुवारी १६ जून २०२२ च्या अध्यादेशानुसार खुलासा केला. बारावीच्या ‘पीसीबी’ ग्रुपमध्ये ४५ टक्के आणि इंग्रजी विषय उत्तीर्ण आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच २३ नोव्हेंबर २०२२ च्या अध्यादेशाच्या खुलाशानुसार पाच जुलै २०२१ रोजीच्या अधिसूचनेनुसार नर्सिंग (१०० गुण प्रवेश प्रक्रियेत यात २० गुण अॅप्टिट्यूड, पीसीबी प्रत्येकी २० गुण आणि २० गुण इंग्रजी) ही परीक्षा झाली नसल्यामुळे बारावी पीसीबी ४५ गुण आणि इंग्रजी उत्तीर्ण हा आधार घेऊन प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश खंडपीठाने दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *