विधानसभा निवडणुकीचे वारे, आदर्श आचारसंहितेनुसार राजकीय फलक झाकले, जिल्हा प्रशासनाचे आदेश, Maharashtra Assembly Election2024
Maharashtra Assembly Election2024
राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय फलक, प्रचार साहित्य, कोनशिला, स्मारके झाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. शहरात आणि ग्रामीण भागात स्थानिक यंत्रणा आचारसंहितेच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रशासकीय पातळीवरुन संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या प्रचाराला अद्याप सुरुवात झाली नसली तरी पुढील आठवड्यात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे. महायुती, महाविकास आघाडी, परिवर्तन महाशक्ती, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम या पक्षांत वेगवेगळ्या मतदारसंघात थेट लढती होणार आहेत. मागील काही निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत पक्ष आणि उमेदवारांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्रचारात अधिक चुरस राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अधिक काटेकोर आणि शिस्तबद्ध निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करण्यात आली आहे. त्याचा आढावा जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
‘विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून निवडणूका निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करा’, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
विधानसभा निवडणूक २०२४ कार्यक्रम जाहीर होताच प्रशासन सज्ज झाले असून यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, कार्यालय प्रमुखांच्या बैठका घेऊन निर्देश देण्यात आले. जिल्हा नियोजन सभागृहात पार पडलेल्या बैठकीस मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस आयुक्त किरण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके, मनपा अपर आयुक्त रणजीत पाटील, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी, पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. बैठकीत आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने माहिती देण्यात आली. त्यात आचारसंहिता अंमलात आल्यापासून अनुक्रमे २४, ४८ व ७२ तासांत करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली.
—४८ तासात करावयाची कार्यवाही
सर्वच केंद्र शासनाचे व राज्य शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मालकीचे, सार्वजनिक ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भूखंड, इमारती, जागा, संरक्षक भिंती मैदाने व इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांवरील, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, परिसर, पूल, उड्डाणपूल, विद्युत खांब, टेलिफोनचे खांब, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, सर्व निमशासकीय वाहने, रुग्णवाहीका इत्यादीवरील राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी-माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य, जाहीराती निदर्शनास येऊ नये यासाठी त्यांचे विरुपण करणे, झाकणे, आवेष्टीत करणे.
—-७२ तासात करावयाची कार्यवाही
सर्व खासगी ठिकाणांवरील, मालमत्तेवरील, भूखंड, घरे, कार्यालये, इमारती, दुकाने, संरक्षक भिंती, आस्थापना व सर्वच खाजगी ठिकाणे, रुग्णालये, दवाखाने, हॉल्स, प्रेक्षागृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी वाहने, बस, रेल्वे, विमाने, हेलिकॉप्टर, रुग्णवाहिका इत्यादी राजकीय पक्ष, आजी-माजी राजकीय पदाधिकारी, आजी माजी आमदार, खासदार, मंत्री, राजकीय व्यक्ती इत्यादी राजकीय पदाधिकारी यांचे उभारलेले, स्थापित केलेले, प्रदर्शित केलेले नामफलके, कोनशिला, उद्घाटन फलके, झेंडे, उद्घाटन शिला व इतर तत्सम प्रचार साहित्य निदर्शनास येऊ नये. यासाठी त्यांचे विरुपण करणे, झाकणे, आवेष्टीत करणे. उपरोक्त नमूद कार्यवाही करण्यासाठीची वरीलप्रमाणे नमूद ठिकाणांची निश्चिती आपले अधिनस्थ यंत्रणेमार्फत तात्काळ करण्यात यावी. तसेच विषयांकीत निवडणूकीची आदर्श आचारसंहिता लागू होताच वरील नमूद प्रमाणे तसेच पत्रात नमूद निर्देशांनुसार आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी माहिती देण्यात आली.
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, महानगरपालिका हद्दीत असलेल्या विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता अंमलबजावणी, मतदार जनजागृती, मतदारांना मतदान केंद्रावर द्यावयाच्या सुविधांबाबत पूर्तता करण्यात मनपा प्रशासन सक्रियतेने कामकाज करीत असून यासंदर्भात निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केले जाईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, निवडणूक प्रक्रिया कालावधी पाहता सर्व आवश्यक पूर्वतयारी करुन सर्व यंत्रणांनी सज्ज राहणे आवश्यक आहे. मतदारांना निर्भय आणि निष्पक्ष वातावरणात आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, सर्व विभागांनी आपापसात समन्वय व संवाद राखून आचारसंहिता अंमलबजावणीची व निवडणूक प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण करावी. विधानसभा मतदारसंघनिहाय या सर्व कार्यवाहीसाठी सर्व यंत्रणांना समन्वय असणे आवश्यक आहे. सर्व नियमांची माहिती व अभ्यास करणे आवश्यक आहे. जिल्हास्तरावरुन आवश्यकतेनुसार मार्गदर्शन सुविधाही उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले.
—-विधानसभा निवडणूक कार्यक्रम
मंगळवार, २२ ऑक्टोबर – निवडणूक अधिसूचना प्रसिद्धी
मंगळवार, २९ ऑक्टोबर – नामनिर्देशन सादर करण्याचा अंतिम दिनांक
बुधवार, ३० ऑक्टोबर – नामनिर्देशपत्र छाननी
सोमवार, ४ नोव्हेंबर – नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची अंतिम मुदत
बुधवार, २० नोव्हेंबर – मतदान
शनिवार, २३ नोव्हेंबर – मतमोजणी
सोमवार, २५ नोव्हेंबर – निवडणूक प्रक्रिया पूर्ण
दरम्यान, महाराष्ट्रात मागील पाच वर्षांत वेगवेगळे तीन सरकार सत्तारुढ झाले होते. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस, भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अशी सरमिसळ झाली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यांचे दोन गट तयार झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने महायुतीवर मात केली. विधानसभा निवडणुकीत अटीतटीची लढत आहे. वेगवेगळ्या योजना आणि प्रचारात आघाडी घेत महायुतीने महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे केले आहे. शिवाय, इतर लहान पक्षांच्या उमेदवारीने कुणाच्या अडचणी वाढणार याचे चित्र स्पष्ट नाही. या परिस्थितीत होत असलेल्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.