Vidhansabha Election 2024 शरद पवारांचा माजलगाव, परळी, बीड या ठिकाणी उमेदवारीसाठी सस्पेन्स ?
माजलगाव,परळी आणि बीड या तीन विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढती कशा असतील ?
विधानसभेचे बिगुल वाजले आहे त्याबरोबरच महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत . जसजशी निवडणूक जवळ येत आहे, तस तशी आपल्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल याची उत्सुकता जनतेला लागलेली आहे. तसेच काही असे मतदारसंघ आहेत की त्या मतदारसंघात उमेदवार कोण असेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली आहे. आज आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव , परळी आणि बीड या तीन विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढती कशा असतील याचा अंदाज घेणार आहोत.
Vidhansabha Election 2024 : माजलगाव विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाकडून कोण उमेदवार ?
सर्वप्रथम आपण माजलगाव विधानसभा मतदार संघाचा आढावा घेऊ या मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार प्रकाश सोळंके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे . या उमेदवारीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण एक ते दीड महिन्यापूर्वीच प्रकाश सोळंके यांनी आपण राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा केली होती आणि आपला वारसदार म्हणून आपला पुतण्या जयसिंह सोळंके यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामुळे जयसिंह सोळंके यांनी सर्व मतदार संघ पिंजून काढत विधानसभेची जोरदार तयारी केली होती, उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची त्यांना खात्री होती पण !अजित पवार गटाची यादी जाहीर झाली आणि माजलगाव मतदार संघातून आश्चर्यकारक रित्या प्रकाश सोळंके यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली यामुळे जयसिंह सोळंके हे कमालीचे नाराज असल्याची चर्चा संपूर्ण माजलगाव मतदार संघात रंगत आहे . या सर्व राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर जयसिंह सोळंके काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. ते अपक्ष म्हणून लढतात की आपल्या काकांना सपोर्ट करून पुढच्या विधानसभेची वाट पाहतात हे आपल्याला लवकरच कळेल. तर दुसरीकडे प्रकाश सोळंके यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून कोण उमेदवार असेल याचा सस्पेन्स शरद पवारांनी कायम ठेवला आहे प्रामुख्याने शरद पवार गटाकडून या मतदारसंघात दोन नावांची जोरदार चर्चा आहे , रमेश आडसकर आणि मोहन जगताप या दोघांपैकी शरद पवार कोणाला उमेदवारी देतात की धक्का तंत्राचा वापर करत तिसऱ्याच कोणाला उमेदवारी देतात हे आपल्याला येत्या दोन-तीन दिवसात कळेलच .
परळी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी मराठा आणि ओबीसी समीकरणाचा विचार करून उमेदवार ?
यानंतरचा दुसरा मतदार संघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटांकडून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. धनंजय मुंडे हे परळी विधानसभा मतदार संघात आपली एक पकड मजबूत करण्यासठी सतत मतदारसंघात दौरे करत असतात हे आपण नेहमी पाहत असतो त्यामुळे त्यांना या मतदारसंघातील सर्व बलस्थाने व कमकुवत बाजु माहिती आहेत म्हणूनच त्यांनी आजपर्यंत विरोधकांना इथे मोठे होऊ दिले नाही. पण या विधानसभेला त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार कोण हा सस्पेन्स अजूनही कायम आहे .परळी विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांमध्ये राजाभाऊ फड, सुदामती गुट्टे, संजय दौंड आणि बबन गीते यांच्या पत्नी यांची नावे आघाडीवर आहेत परळी विधानसभा मतदारसंघ हा मुंडे कुटुंबीयांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो,तसेच या मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि वंजारी समाज हा गोपीनाथ मुंडे यांना मानणारा समाज म्हणून ओळखला जातो,आज घडीला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे आपसातील सारे मतभेद विसरून एकत्र आलेले आहेत , त्यामुळे मुंडे कुटुंबातील सदस्यांचा पराभव करणे या मतदारसंघात फार मोठे आव्हान आहे . हे आव्हान कोणता उमेदवार पेलु शकतो, याची चाचपणी सध्या शरद पवार करत आहे .त्यामुळे या ठिकाणी मराठा आणि ओबीसी समीकरणाचा विचार करून वंजारी समजाचा उमेदवार द्यायचा की मराठा समाजाचा उमेदवार द्यायचा त्यांनी हा सस्पेन्स कायम ठेवलेला आहे.तसेच मनोज जरांगे पाटील परळी विधानसभा मतदार संघामध्ये आपला उमेदवार देतात का ? यावर देखील शरद पवार आपल्या उमेदवार ठरवु शकतात अशी चर्चा आहे. येत्या दोन दिवसात आपल्याला शरद पवार कोणता उमेदवार देतील हे कळेलच यावरून परळी मतदारसंघाचे समीकरण ठरेल.
बीड या मतदारसंघात शरद पवार कोणाला उमेदवारी देतील
यानंतरचा तिसरा आणि शेवटचा मतदार संघ म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघ बीड जिल्ह्याचे विद्यमान खासदार हे शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आहेत.लोकसभेला पंकजा मुंडे यांच्या पराभवात बीड विधानसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना मिळालेली निर्णायक लीड याचा मोठा वाटा आहे. बीड मतदारसंघातील मुस्लीम समाजाची व दलित समाजाची मते मिळवण्यास शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे यशस्वी झाल्याचे आपण पाहिले यामुळे बीड विधानसभा मतदारसंघ हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी पोषक मतदारसंघ समजला जातो .अर्थातच ही लीड मिळवून देण्यासाठी शरद पवार गटाचे बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी खूप मेहनत घेतल्याचे बोलले जात आहे यामुळे बीड विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून प्रबळ उमेदवार म्हणून संदीप क्षीरसागर यांच्या नावालाच पसंती आहे पण मतदार संघाची समीकरणे पाहता मतदार संघात त्यांच्याविषयी नाराजी असल्याची चर्चा असल्यामुळे शरद पवार इथून जयदत्त क्षीरसागर किंवा ज्योती मेटे यांचा विचार करू शकतात आशी माहिती स्थानिक पत्रकार सांगत आहेत.याबरोबरच बीडमध्ये अजित पवार गटाकडून कोणाला उमेदवारी दिली जाते याची वाट देखील शरद पवार पाहत असावेत. अजित पवार यांच्या गटाकडून योगेश क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा आहे. यामुळे अजित पवारांनी आपला उमेदवार जाहीर केल्यानंतरच आपला उमेदवार शरद पवार जाहीर करतील अशी माहिती स्थानिक पत्रकार देत आहेत. मंडळी तुम्हाला काय वाटतं माजलगाव, परळी, बीड या मतदारसंघात शरद पवार कोणाला उमेदवारी देतील हे आपल्याला लवकरच कळेल .
हेही वाचा : बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार