Eknath Shinde Vidhansabha 2024 दिघे विरूद्ध शिंदे लढाईत काय घडणार ?
मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर कडवे आव्हान ?
ठाणे जिल्ह्यात दिघे नावाचं मोठं गारुड. दिवंगत आनंद दिघे यांचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा सर्वच पक्षांसाठी राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा जिल्हा. सुरुवातीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा, आनंद दिघे यांच्यामुळे कायम चर्चेत राहिला. आनंद दिघे यांनी जनसामान्यांसाठी केलेली काम, आणि सर्वसामान्यांचा मिळवलेला विश्वास, त्यामुळे जनतेकडून आनंद दिघेंना खूप प्रेम मिळालं. पुढे दिघे यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात शिवसेनेची कमान सांभाळली. आनंद दिघे यांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला मीरवू लागले. आणि शिवसेना फुटीनंतर तर आनंद दिघे यांच्या नावाचा उदो उदो करण्याला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फुटीर आमदारांनी सुरुवात केली. शिंदे यांच्या बंडात सामील झालेल्या 40 साथीदारांनी आम्ही दिघेंचे वारस, आम्ही विचारांचे वारस अशी कॅसेट वाजवायला सुरुवात केली. आता विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असणाऱ्या कोपरी पाच पाखडी या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आला आहे. स्वतःला आनंद दिघे यांचे शिष्य आणि वैचारिक वारस समजणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिघे कुटुंबातून आव्हान असणार आहे. त्यामुळे यंदाची ही लढत शिंदेंना जड जाणार की केदार दिघे जायन्ट किलर ठरणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Eknath Shinde Vidhansabha 2024
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले गुरु आनंद दिघे यांच्या नावाचा राजकारणात भरपूर वापर केल्याचा आपण पाहिलं. विशेषता त्यांच्या ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे नावाचे गारुड लोकांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा मोठ्या प्रमाणात वापर केला. धर्मवीर सिनेमा काढला. यातूनही त्यांनी एक चांगला भावनिक आधार मिळवलाआणि मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी एकनाथ शिंदे यांनी मिळवली. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गद्दार म्हणून ठेवलेला ठपका पुसण्यात या धर्मवीर १ आणि धर्मवीर २ मु.पोस्ट ठाणे या चित्रपटाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांनी यश मिळवल्याचा आपण पाहिले.आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या दोन नेत्यांच्या मार्गावरच आपण राज्यकारभार करत आहोत, असं शिंदे वेळोवेळी म्हणतात.
या लढाईकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
शिवसेना फुटी नंतर अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली, तर दुसरीकडे आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी उद्धव ठाकरेंची साथ देणं पसंत केलं. त्यामुळे दिघे कुटुंब हे ठाकरेंच्या सेने सोबत आहे, असा एक मेसेज त्या माध्यमातून लोकांमध्ये गेला. लोकसभा निवडणुकी वेळी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे विरुद्ध केदार दिघे अशी लढाई होईल असं बोललं जात होतं, मात्र त्यावेळी केदार दिघेंना ठाकरेंनी उमेदवारी दिली नाही. आता मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे यांच्या विरोधात दिघे कुटुंबातला सदस्य देऊन, ठाकरे यांनी शिंदे यांची नाकाबंदी करण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जातंय. कोपरी पाच पाखडी या मतदारसंघातून एकनाथ शिंदे हे मागच्या तीन टर्म पासून निवडून येत आहेत. त्यामुळे चौथ्यांदा शिंदे या मतदारसंघातून निवडणुकीसाठी सज्ज आहेत. मात्र यंदा त्यांच्यापुढे आव्हान असेल ते दिघे कुटुंबातल्या सदस्यांच. सद्यस्थितीला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे निश्चितच या लढाईकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा : माजलगाव,परळी आणि बीड या तीन विधानसभा मतदारसंघातील हाय व्होल्टेज लढती कशा असतील ?
मुख्यमंत्री म्हणून असणार त्यांच वलय, प्रशासनात असणारा राबता या सगळ्या गोष्टी पाहता, मागच्या काही काळात अनेक निर्णय एकनाथ शिंदेंनी या मतदारसंघासाठी देखील घेतले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना निवडणूक फारशी जड जाणार नाही असं बोललं जात होतं. मात्र दिघे कुटुंबातला सदस्य त्यांच्या विरोधात उतरवण्याची मोठी खेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासमोर आता कडवं आव्हान असणार आहे यात काही शंकाच नाही. पण विद्यमान मुख्यमंत्री असल्यामुळे एकनाथ शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या कमालीचे पॉप्युलर झालेले आहेत . त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे त्यांची बाजू अजूनच मजबूत झालेली आहे यामुळे त्यांना हरवणे सोपे नाही . ही लढत दिघे विरुद्ध शिंदे आशी होणार असल्यामुळे या मतदारसंघाची चर्चा होणार आहे. केदार दिघे सध्या ठाकरेंच्या सेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत. त्यामुळे दिघे कुटुंबाला साथ देणाऱ्या शिवसैनिकांची मोठी संख्या या जिल्ह्यात आणि या मतदारसंघात आहे. सहाजिकच आनंद दिघे यांचे पुतणे असल्यामुळे केदार दिघे हेही आपलं वलय कायम राखण्यात यशस्वी झाले आहेत. त्यात त्यांना ठाकरेंची साथ मिळणार असल्यामुळे केदार दिघे ही विधानसभा कशी लढवतात हे देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. लोकसभा निवडणुकी वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ठाणे आणि कल्याण या दोन्ही मतदारसंघात अर्थात आपल्या बालेकिल्ल्यात लोकसभेला विजय मिळवला. आणि आपणच या प्रदेशाचे राजे आहोत हे सिद्ध केलं. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही या दोन जिल्ह्यात त्यांना सोपी जाईल, असं म्हटलं जात आहे. शिवसेना फोडल्यामुळे ठाकरे एकनाथ शिंदेंवर नाराज आहेत, तसेच इतर शिंदे यांना साथ देणारया आमदारांवर ठाकरेंची नाराजी आहे. त्यामुळे ठाकरेही 40 आमदारांना पाडण्यासाठी आपले डावपेच आखत आहेत. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात केदार दिघेंसारखा दिघे कुटुंबातला सदस्य दिल्यामुळे शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघात अडकून ठेवण्यासाठी ठाकरे यशस्वी होतील असं बोललं जात आहे. जर एकनाथ शिंदे त्यांच्या मतदारसंघात अडकणार असतील, तर इतर त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार कोण करणार, हा ही प्रश्न उपस्थित होणार आहे.
तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे अशा या लढतीमध्ये कोण विजयी होईल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.