Eknath Shinde and Bjp Vidhansabha Election 2024 या पाच गोष्टींमुळे एकनाथ शिंदे भाजपलाच जड जाताय ?

एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाकडून जागावाटपाच्या मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता

महायुतीचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. हर्षवर्धन पाटील यांनी नुकतच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचे जाहीर केलं. महाविकास आघाडीमध्ये देखील लवकरच जागावाटप होईल असं वक्तव्य अनेक महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. महायुतीमध्ये देखील अमित शहा, नरेंद्र मोदी आदी ज्येष्ठ नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यातून कुठेतरी महायुतीचं जागावाटप फायनल होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. मात्र जागावाटपच्या या चर्चेमध्ये महायुतीमध्ये मोठा भाऊ असणाऱ्या भाजपाला टेन्शन येण्याची दाट शक्यता आहे. अर्थात हे टेन्शन एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाकडून जागावाटपाच्या मुद्द्यावर वाद होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

Eknath Shinde and Bjp Vidhansabha Election 2024

अमित शहा आणि मोदींनी महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करण्याच आवाहन केला असला तरी. जागावाटपाचा फॉर्मुला नेमकं काय ठरतो हे अजून तरी ठरलेलं नाही. एकीकडे भाजप 160 ते 180 जागा लढण्याचा आग्रह करत आहे. शिंदे यांची शिवसेना देखील 80 ते 100 जागा लढवणार असल्याचे म्हणत आहे. अजित पवारांचा पक्ष देखील 50 ते 60 जागांवर आपली ताकद असल्याच म्हणत आहे. अजित पवार 50 ते 60 जागांचा विचार करत असले तरी, त्यांना भाजप 40 ते 50 जागा देऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे 80 ते 100 जागेचा आग्रह धरून आहेत, त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपाच्या मुद्द्यावर कुठेतरी तीव्र संघर्ष होण्याचा अंदाज व्यक्त होतो आहे. एकनाथ शिंदे मागच्या काळापासून अर्थात शिवसेना फुटी नंतर महायुतीचे राज्यात सरकार आलं, तेव्हापासून मुख्यमंत्री आहेत, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा भाजप एकनाथ शिंदे यांचा वापर करेल, आणि एकदा का वापर झाला, की शिंदेंना दूर करण्यात येईल, अशी एक शक्यता व्यक्त होत होते. तसेच फडणवीस उपमुख्यमंत्री असले तरी, सरकारमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं वर्चस्व राहील, अशी दुसरी शक्यता व्यक्त होत होते. त्यातच मधल्या काळात अजित पवारांची राष्ट्रवादी ही महायुती सोबत आली, तेही दुसरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महत्त्व कमी होईल, असा विश्लेषण राजकीय विश्लेषक करत होते, मात्र, ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी कामांचा धडाका लावला. तो निश्चितच भाजपच्या गोटामध्ये अशांतता निर्माण करणारा होता.

फक्त पक्षच नाही तर पक्षाचे नेते देखील सांभाळण्यात यश मिळवलं.

मात्र एकनाथ शिंदे यांच्यामुळेच राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आलं, नाही तर भाजप सत्तेपासून दूर राहिली असती, असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी अलीकडे केलं. त्यामुळे महायुतीत सद्यस्थितीला आम्हीच मोठे भाऊ आहोत असं देखील गायकवाड म्हणाले. यावरून नेत्यांना एकनाथ शिंदे यांचं अभय आहे, असा एक अंदाज व्यक्त होतो आहे. मुख्यमंत्री म्हणून कार्य करत असताना एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने आपला पक्ष सांभाळा, सोबत आलेले आमदार खासदार यांनाही टिकून ठेवण्यात यश मिळवलं, त्यावरून एकनाथ शिंदे हे उत्तम संघटक असल्याचे सिद्ध झालं. आणि एकनाथ शिंदे यांचं असं असणं, किंवा असं काम करणं हेच मुळात भाजपला डोईजड झाल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे हे महायुती सोबत असताना मुख्यमंत्रीपदाचा आग्रह करत होते, आणि शेवटपर्यंत त्या शब्दावर ते कायमही राहिले. त्यानंतर युती तुटली महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झालं. आणि जवळपास अडीच वर्षाचा कारभार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात झाला. त्याचाच बदला घेण्यासाठी पुढे शिंदेंच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली, आणि ठाकरेंना धडा शिकवला असं काही भाजपचे नेते म्हणाले. शिंदे मुख्यमंत्री झाले, पक्षाचे प्रमुख नेते देखील झाले, आणि असं करत त्यांनी शिवसेना आजवर सांभाळली. फक्त पक्षच नाही तर पक्षाचे नेते देखील सांभाळण्यात यश मिळवलं.

 

हेही वाचा : दिघे विरूद्ध शिंदे लढाईत काय घडणार ?

लोकसभा निवडणुकीला भाजपसोबत जागा वाटपाचा तिढा सोडवताना, शिंदेंनी 15 जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या. त्यातल्या सात जिंकण्यात यशही मिळवलं. तसंच भाजपने केलेल्या सर्वेमुळे ज्या विद्यमान शिवसेनेच्या खासदारांची तिकीट नाकारण्यात आली, त्यांना देखील कुठेतरी पुनर्वसन करण्यासाठी महामंडळावर नियुक्ती देण्यात आली, तर काहींना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं, याचाच अर्थ शिंदेंनी उत्तम पद्धतीने पक्ष आजवर सांभाळला. त्यामुळेच विधानसभेच्या जागावाटपाच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे आता भाजपला जड जात आहेत. उद्धव ठाकरे महायुतीत असताना आडमुठेपणाची भूमिका घेत होते, असे आरोप भाजप नेत्यांनी केले. आता त्याच उद्धव ठाकरेंच्या मार्गावर एकनाथ शिंदे देखील जाण्याची शक्यता आहे. कारण राज्यात मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी काम केलं. उद्या पक्ष टिकवायचा असेल, तर मोठ्या प्रमाणात जागा जिंकाव्या लागणार आहेत. त्यासाठी आधी जास्त जागा पदरात पाडून घ्यावा लागतील, हे शिंदे यांच्या लक्षात आलं. त्यामुळे मराठवाडा, कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या महत्त्वाच्या जागांवर शिंदेच्या पक्षाने हक्क सांगितला आहे. 2019 च्या निवडणुकीला महायुती म्हणून तत्कालीन शिवसेनेने जिंकलेल्या 54 जागा, या जागांवर शिंदेनी हक्क सांगितला आहे. त्यासोबतच शिंदे सोबत आलेल्या अपक्ष आमदारांच्या ज्या दहा-बारा जागा आहेत, त्यावरही एकनाथ शिंदे यांनी हक्क सांगितला आहे. त्यामुळे अशा एकूण ह्या 65 ते 70 जागा. शिवाय मराठवाड्यामध्ये ज्या भाजपला जागा जिंकता येणार नाहीत, त्या जागांवर ही एकनाथ शिंदे लढण्यासाठी इच्छुक आहेत. मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टर मुळे भाजप काहीसा अडचणीत असल्याच सर्वे आहे, त्यामुळे 2019 ला ज्या जागा भाजप मराठवाड्यात लढवल्या, त्या जागा लढण्यासही शिंदेंची सेना इच्छुक आहे.

महायुती म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा, आणि आता राज्यातले देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदें सोबत कशा पद्धतीने वाटाघाटी करण्यात यश मिळवतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र जागावाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे भाजपला डोईजड झाले आहेत, हे मात्र भाजपला ही स्वीकारावं लागेल. त्यासाठी अनेक असे मुद्दे आहेत, ज्यावरून शिंदे यांनी भाजपच्या विरोधी भूमिका आणि निर्णय घेतल्याच आपण मागच्या काळात पाहिलं. सद्यस्थितीला राज्यातल्या महत्त्वाचे महामंडळ, यावर देखील शिंदे यांच्या नेत्याच्या नियुक्ती होत आहेत. नुकताच सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाठ झाले, भरत गोगावले यांना एसटी महामंडळावर पाठवण्यात आलं. हे सगळे निर्णय शिंदेंच्या पक्षाने आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या परस्पर घेतल्याचे म्हटलं जात आहे. यावरूनच भाजपासाठी एकनाथ शिंदे आता उद्धव ठाकरे पेक्षा जास्त आडमुठे ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तुम्हाला काय वाटतं, विधानसभेच्या जागावाटपाबाबत शिंदे भाजप पुढे नमतं घेतील, की वरचंड ठरत आपल्या जागा पदरात पाडून घेतील .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *