Assembly Election 2024 विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांचे रूसवे-फुगवे, स्वबळावर लढण्याचा निर्णय
महायुती-महाविकास आघाडीवर आरोपांच्या फैरी
Assembly Election 2024
विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी जागा दिल्या नसल्याने त्यांचे घटकपक्ष स्वतंत्र लढणार आहेत. महाविकास आघाडीचे घटक असलेल्या भीमशक्ती सामाजिक संघटना, संभाजी ब्रिगेड यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर महायुतीतील राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर करीत उमेदवारही जाहीर केले आहेत. ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार टाकला आहे. त्यांनी बारा जागा देण्याची मागणी केली होती. शेतकरी संघटना, डावे पक्ष यांनीही महाविकास आघाडीशी काडीमोड घेतला आहे. लहान-मोठ्या संघटना पक्षात विलिन झाल्या आहेत किंवा स्वबळावर लढत आहेत. त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघात नक्कीच होणार आहे.
—भीमशक्ती सामाजिक संघटना स्वतंत्र लढणार
भाजपा आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात भिमशक्ती संघटना संघर्ष करीत आलेली आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी हीच गुणवत्ता ध्यानात घेऊन ‘भिमशक्ती’ संघटनेच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि महाविकास आघाडीने उमेदवारी देणे आवश्यक होते. निवडणुकीत डावलल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे भिमशक्ती संघटना विधानसभेच्या १०० जागा स्वबळावर लढविणार आहे, असे ‘भिमशक्ती’चे उपाध्यक्ष दिनकर ओंकार यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
भिमशक्ती संघटनेच्या राज्य कार्यकारणीची बैठक नुकतीच पार पडली. प्रदेश कार्याध्यक्ष माजी महापौर अशोक दिवे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मोहन माने, भाई कैलास सुखधाने, दिलीप भोजराज, रवी सोनकांबळे, प्रमोद रत्नपारखे, संतोष भिंगारे, हंसराज मेश्राम, मधुसुदन भटकर, शशिकांत बनसोडे, एन. के. कांबळे हे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणूक आणि भिमशक्तीचे राजकीय अस्तित्व यावर सखोल चर्चा झाली. भिमशक्ती सामाजिक संघटना गेल्या २५ वर्षांपासून राज्यात पुरोगामी विचारावर खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे. सामाजिक न्यायाचा विचार जोपासून संघटनेने काँग्रेस पक्षाला उभारी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ताकदीने प्रचार केला होता. परंतु भिमशक्तीच्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी करुन घेतले पाहिजे, ही भावना काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या मनात दिसत नाही. आम्हाला गृहित धरुन निवडणूक लढण्याचे दिवस आता राहिलेले नाही, असे जाहीर करीत पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
—रिपाइंचा बहिष्कार
हेही वाचा : मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ जोरात, ४६ जागांचे चित्र बदलणार
विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाने महायुतीकडे बारा जागा देण्याची मागणी केली होती. मात्र, मित्रपक्षांना डावलून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या जागा वाढविल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोष असून ‘रिपाइं’ने महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार घातला आहे. वरिष्ठ नेते रामदास आठवले यांचे आदेश येईपर्यंत बहिष्कार कायम राहील, अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची बैठक शनिवारी शहर कार्यालयात पार पडली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, शहराध्यक्ष नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, विजय मगरे, दिलीप पाडमुख, प्रवीण नितनवरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीत घटकपक्ष असल्यामुळे ‘रिपाइं’ला बारा जागा देण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी प्रत्येकी तीन जागा सोडल्या पाहिजे, असे आठवले यांनी म्हटले होते. मात्र, महायुतीच्या जागा जाहीर झाल्या असून ‘रिपाइं’ला अद्याप एकही जागा सोडलेली नाही. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत महायुतीचा निषेध करण्यात आला. ‘शिंदे, फडणवीस आणि पवार यांनी स्वत:च्या जागा वाढवून घेतल्या आहेत. मित्रपक्षाला जागा देण्याची भूमिका घेतली नाही. सत्तेत बसण्यासाठी यांना दलितांची मते हवी आहेत. राज्यात ‘रिपाइं’ची अवहेलना सुरू आहे. कार्यकर्त्यांत असंतोष असून महायुतीचे काम करणार नसल्याचा ठराव घेतला आहे’, असे कदम यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमात ‘रिपाइं’च्या कार्यकर्त्यांना सन्मानावे वागवले जात नाही. विचारात घेतले जात नाही. शहरात महायुतीचे प्रदीप जैस्वाल आणि संजय शिरसाट यांच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. पण, आम्हाला बोलावले नाही. त्यामुळे महायुतीच्या प्रचारावर बहिष्कार टाकत असल्याचे कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी सांगितले. तसेच कुणी पदाधिकारी प्रचारात आढळल्यास पक्षांतर्गत कारवाई करण्याचा इशारा कदम यांनी दिला आहे.
—संभाजी ब्रिगेडही स्वबळावर लढणार
राज्यातील विधानसभा निवडणुकीबाबत शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजी ब्रिगेडला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही युती तुटली असून संभाजी ब्रिगेड स्वबळावर लढणार आहे. राज्यात ५० पेक्षा अधिक उमेदवार देणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी दिली आहे.
संभाजी ब्रिगेडने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, गंगाधर बनबरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दोन वर्षापूर्वी शिवसेनेशी संभाजी ब्रिगेडची युती झाली होती. लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेनेचा व महाविकास आघाडीचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेला संभाजी ब्रिगेडला त्यांच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु विधानसभेच्या जागा वाटपात आम्हाला सन्मानपूर्वक स्थान दिले नाही, असे प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे. शिवसेना (उबाठा) बरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत. फॅसिस्ट शक्तींना संभाजी ब्रिगेडचा नेहमीच विरोध राहील. लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही लोकांचे प्रश्न, महामानवांचे विचार घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. सुमारे ५० जागावर उमेदवार अर्ज भरणार आहेत. महायुतीची सनातन विषमता व आघाडीचे नकली पुरोगामित्व याविरोधात समाजमत तयार करण्याची गरज आहे, असे भानुसे यांनी म्हटले आहे.