Baramati Vidhansabha 2024 बारामतीत तुतारीची खेळी काका विरोधात पुतण्याला उमेदवारी ?

बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

बारामती विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनाच पक्षाने तिकीट जाहीर केलं. नाही नाही म्हणणारे अजित पवार पुन्हा बारामती विधानसभेच्या रिंगणात उतरले, त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची चर्चा राज्यात पुन्हा सुरू झाली. तब्बल सात वेळा अजित पवार या मतदारसंघातून विजयी होत आले आहेत. उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री ,जलसंपदा मंत्री, अशी अनेक खाती देखील त्यांनी सांभाळले आहेत. त्यामुळे राजकारणातला भरपूर अनुभव असणारे अजित दादा यंदाची विधानसभा कशी लढवतात हे पाहणं रंजक ठरणार आहे. कारण अजित पवारांच्या विरोधात त्यांचाच पुतण्या युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे काका विरुद्ध पुतण्या अशी ही लढाई, होणार असून त्याची चर्चा आत्ताच राज्यभरात सुरू झाली आहे.

Baramati Vidhansabha 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटी नंतर पवार कुटुंब विभागलं गेलं. अजित पवारांनी पक्ष फोडल्यामुळे कुटुंबामध्ये त्यांच्या विरोधात नाराजी निर्माण झाली. पत्नी सुनेत्रा पवार आणि अजित पवारांची दोन मुले वगळता, पूर्ण पवार कुटुंब शरद पवारांच्या पाठीशी ठाम राहिलं. पुढे लोकसभा निवडणुकी वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली, तेव्हा तर पवार कुटुंब आणखीच विभागलं. एकमेकांची जुनी काढण्यात आली, सासर माहेर काढण्यात आलं. तेव्हा देखील पवार घराण्यात झालेली लढत आपल्याला पाहायला मिळाली. पुढे सुप्रिया सुळे लोकसभेला विजयी झाल्या तर सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. तेव्हापासून पवार घराण्यामध्ये अजित पवारांविषयी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

यंदाची बारामती विधानसभेची लढत अजित पवारांसाठी आव्हानात्मक ?

सुप्रिया सुळे यांची साथ देणारे अजित पवाराचे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत, त्यांना विजयी करण्याच आवाहन केलं होतं. अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केल्याच आपण पाहिलं. तर अजित पवारांनीही युगेंद्र पवारांसह ज्येष्ठ पवारांना साथ देणाऱ्या सर्वांवर टीका केली. त्याचवेळी बारामती विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील अशी घोषणा, ज्येष्ठ पवारांनी केली होती. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे आहेत. बारामती परिसरामध्ये एक उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक कार्यात देखील ते अग्रेसर आहेत. तसेच कुस्ती संघटनेचे पदाधिकारी म्हणून मागच्या काही वर्षांपासून ते कार्यरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये मिसळण्याचा आणि सर्वसामान्यांची माहिती असणारा उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांनी आपली ओळख तयार केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुद्द ज्येष्ठ पवारांची ताकद ही युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे असणार आहे, त्यामुळे यंदाची बारामती विधानसभेची लढत अजित पवारांसाठी काहीशी आव्हानात्मक आणि अडचणीची ठरण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

अजित पवार आज पर्यंत या मतदारसंघातून तब्बल सात वेळा निवडून आले आहेत. तसेच या मतदारसंघांमध्ये विकास काम करण्यात, पुढाकार अजित पवारांनी घेतलेला आहे. कार्यकर्त्यांची फळी आणि जनतेशी नाळ जोडल्यामुळे अजित पवार सातत्याने या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांच्या विरोधात प्रत्येक वेळी विरोधकांनी मोठा उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, त्यांना अडचणी निर्माण देखील केल्या, मात्र अजित पवार प्रत्येक वेळी मोठ्या लीड ने विजय होत आले. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी तब्बल एक लाख 95 हजार मतं घेतली होती. तेव्हा हा त्यांचा राज्यातला सगळ्या मोठा विजय होता. मात्र राष्ट्रवादीच्या फुटी नंतर पक्षात आणि पवार कुटुंबात मोठं अंतर पडलं. शरद पवारांना शह देत अजित पवारांनी राष्ट्रवादी आणि चिन्ह आपल्या ताब्यात घेतलं. तसंच पक्षातले 40 आमदारही आपल्याकडे घेतले. आणि शरद पवारांना न्यायालयीन लढाई करण्यास भाग पाडलं. या सगळ्या घडामोडीची तसेच पक्ष फुटीची शरद पवारांना मोठी सहानुभूती मिळाली. लोकसभा निवडणुकीत या सहानुभूतीची जाणीव आपण सगळ्यांनी पाहिली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तब्बल दहा जागा लढवल्या होत्या. त्यापैकी आठ जागांवर त्यांनी विजय मिळवला. बारामती, शिरूर, या दोन जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार होते. त्यांचाही पराभव लोकसभेला झाला. अजित पवारांच्या पत्नी खुद्द सुनेत्रा पवारांचा देखील लोकसभेला पराभव झाला.

युगेंद्र पवार अजित पवारांवर जड ठरू शकतात ?

आता विधानसभेच्या रिंगणामध्ये अजित पवारांची लढत त्यांच्या पुतण्याशी होणार आहे . युगेंद्र पवार राजकारणात फारसे रुळेलेले नाहीत. मात्र लोकसभा निवडणुकी वेळी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारादरम्यान त्यांनी मतदारसंघात आणि प्रत्येक गावात आपली छाप पाडली. तसंच सामाजिक कार्यामुळे तरुण वर्गामध्ये त्यांनी त्यांची ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये युगेंद्र पवार हे लोकप्रिय झालेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांचे उमेदवार म्हणून युगेंद्र पवार अजित पवारांवर जड ठरू शकतात.

 

हेही वाचा : प्रीतम मुंडे विधानसभेच्या रिंगणात उतरतील ?

दुसरीकडे लोकसभेला सुप्रिया सुळे आणि विधानसभेला अजित पवार असा कौल आजपर्यंत बारामती मतदारसंघ देत आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार बारामती मतदारसंघावर नाराज असले तरी, विधानसभेला बारामतीकर त्यांना नाराज करणार नाहीत अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून आणि बारामती मधला लोकप्रतिनिधी म्हणून अनेक संस्था संघटनांवर अजित पवार होल्ड ठेवून आहेत. त्यामुळे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात अजित पवारांसोबत आहेत. बँक, स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या या सगळ्यांवर अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांच्या भरणा आहे. त्यामुळे बारामतीचा विकास करण्यात शरद पवारांच्या पाठोपाठ अजित पवारांचाही मोठा हातभार आहे अशी जाणीव, बारामतीकरांना आहे. देशभरात नावाजलेलं बारामती शहर आणि तालुका, अनेक उद्योग, महत्त्वाच्या संस्था यासाठी पवार कुटुंबाचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सहाजिकच अजित पवारांनी या संस्था वाढवण्यासाठी मागच्या काळात मोठे प्रयत्न केल्याची माहिती बारामतीकरांना आहे. बारामती मतदारसंघांमध्ये वेगवेगळे उद्योग, दळणवळणाची साधनं, बस स्थानक, क्रीडा संकुल आदी विकास करण्यात अजित पवारांनी मोठा पुढाकार घेतल्याचं आपण पाहिलं. मात्र राष्ट्रवादी पक्ष फुटल्यामुळे लोकांचा अजित पवारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकसभा निवडणुकीवेळी बदलला. शरद पवारांनीही त्यांच्या प्रत्येक सभेत, अजित पवारांवर टीका केल्याचा आपण पाहिलं. त्याचवेळी युगेंद्र पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांची साथ न देता, आजोबा शरद पवारांची वेळोवेळी साथ दिली. विशेषता लोकसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी अहोरात्र मेहनत केली.

लोकसभा निवडणुकीनंतर युगेंद्र पवार बारामती मतदारसंघांमध्ये सातत्याने कार्यरत आहेत. आठवड्यातून एक दिवस जनता दरबार देखील ते भरवतात. या दरबारात लोकांच्या समस्या जाणून घेत, त्यावर उपाययोजना करण्यासंदर्भात निर्णय घेतात. त्यामुळे नवखे असणारे युगेंद्र पवार शरद पवारांमुळे अजित पवारांच्या विरोधात तगडे उमेदवार ठरू शकतात. युगेंद्र पवारांच्या पाठीमागे, शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पूर्ण पवार कुटुंब असणार आहे. शेवटी पवार विरुद्ध पवार अशा या लढाईत, लोक पुन्हा एकदा ज्येष्ठ पवारांची साथ देतात, की अजित पवारांना निवडून देतात, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल. मात्र पहिल्यांदाच पवार कुटुंबात पवार विरुद्ध पवार अशी लढाई, होणार असून, राज्याच्या राजकारणात या लढाईची चर्चा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *