मराठवाड्याच्या नाट्यपरंपरेवर महाग्रंथ
मराठवाड्यातील समृद्ध रंगभूमीचा ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ ग्रंथात मागोवा घेण्यात आला आहे. या संशोधनात्मक ग्रंथातून मराठवाड्यातील अद्याप उजेडात न आलेल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. बालरंगभूमी ते नागर रंगभूमीच्या इतिहासाची नाट्य अभ्यासक डॉ. सतीश साळुंके यांनी मूलभूत मांडणी केली आहे.
मराठवाड्याची समृद्ध नाट्य परंपरा प्रदीर्घ संशोधनाद्वारे प्रकाशात आणणारा मराठवाड्याची नाट्यपरंपरा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. इतिहास अभ्यासक, रंगकर्मी डॉ. सतीश साळुंके यांनी हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. प्राचीन ते अर्वाचीन कालखंडाच्या विविध टप्प्यात मराठवाड्यातील नाटकाची उभारणी आणि लोकरंगभूमीतून नाटकाच्या झालेल्या अभिजातीकरणाची चिकित्सा साळुंके यांनी केली आहे. मराठवाड्यातील अनेक गावात शंभर वर्षांपेक्षा जुनी नाट्यपरंपरा आहे. या पार्श्वभूमीवर नाटक ही मराठवाड्याने मराठी माणसाला दिलेली देण असल्याची मुलभूत मांडणी साळुंके यांनी केली आहे. एक हजार पन्नास पानांच्या ‘मराठवाड्याची नाट्यपरंपरा’ ग्रंथात मराठवाड्यातील नाटकांच्या उगमस्थानांचा शालिवाहन कालखंडापासून परामर्श घेतला आहे. जवळपास दीड हजार कलावंतांच्या रंगकार्याची माहिती आहे. दिडशे कलावंत, दिग्दर्शक, नाटककार व तंत्रज्ञांच्या योगदानाचा विस्तृत आढावा आहे. सतरा विभागात विविध कालखंडाची विभागणी असून वाचकांना काही माहिती प्रथमच वाचायला मिळणार आहे.
रंगभूमीवर भरीव योगदान दिलेल्या साळुंके यांनी नाट्य इतिहास लिहून मराठवाड्यातील रंगभूमीला वेगळा आयाम देण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथाचा रसिक आणि अभ्यासकांना विशेष उपयोग होणार आहे. नाटककार प्रा. दत्ता भगत यांनी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आहे, तर दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी पाठराखण केली आहे.
— संशोधन दीर्घकाळ
नाट्यलेखन, शैक्षणिक रंगभूमी, दलित रंगभूमी, बालरंगभूमी, कामगार रंगभूमी, तंत्रज्ञ रंगभूमी, नाट्यगृहांची परंपरा व मराठवाड्याच्या आधुनिक रंगभूमीचे शिल्पकार अशा प्रवाहांवर ग्रंथात विस्तृत चर्चा आहे. मराठवाड्यातील संगीत प्रयोगशील आणि हौशी रंगभूमीविषयी विवेचन केले आहे. साळुंके चार वर्षांपासून संशोधन करीत होते. या भरीव संशोधनासाठी आठ जिल्ह्यातील नाटकांची परंपरा असलेल्या गावांना भेटी देऊन माहिती संकलित करण्यात आली. नव्या-जुन्या रंगकर्मींच्या मुलाखती, जुन्या संहितांचा शोध, जुनी छायाचित्रे-मुलाखती संकलित करणे, जुन्या रंगमंचांची पाहणी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शेकडो दस्तावेजांचा अभ्यास करुन मुद्देसूद मांडणी करण्यासाठी अधिक कालावधी लागला आहे.
—-
मराठवाड्याचा इतिहास विलक्षण वैभवशाली आहे. मराठवाड्याच्या भूमीने मराठी माणसाला नाटक दिले असा मला विश्वास आहे. हा इतिहास मांडण्याचा पूर्वसूरींनी स्तुत्य प्रयत्न केला आहे. पण, मी शालिवाहन कालखंडापासून नाट्य इतिहास मांडत आहे.
डॉ. सतीश साळुंके, नाट्य अभ्यासक