Gangapur assembly election गंगापूरमध्ये सतिश चव्हाण यांची तुतारी प्रशांत बंब यांच्यावर भारी ?
मराठा समाजाची एक गठ्ठा मते ही सतीश चव्हाण यांच्या पारड्यात जाऊ शकतात
Gangapur assembly election
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या गंगापूर खुलताबाद या विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. खरं म्हणजे महाविकास आघाडी कडून या मतदार संघासाठी नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती, शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या जागेसाठी इच्छुक होते.महाविकास आघाडीचे तिकीट मिळवण्यापूर्वी सतीश चव्हाण महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होते.
प्रशांत बंब हे गेली तीन टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत
महायुतीच्या नियमानुसार विद्यमान ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाला ही जागा सोडली जाईल या नियमानुसार प्रशांत बंब हेच महायुतीचे उमेदवार होणार हे निश्चित होतं. अशावेळी सतीश चव्हाण यांना इथली उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश करावा लागला. आणि त्यानिमित्ताने महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मजबूत उमेदवार देखील मिळाल्याचे सांगितलं जात आहे.
इथले विद्यमान आमदार असणारे प्रशांत बंब हे गेली तीन टर्म पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत , त्यामुळे भाजपने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. चव्हाण यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून बाहेरचा उमेदवार असल्याचे देखील टीका केली. प्रशांत बंब यांच्यासाठी हा मुद्दा देखील प्रचारासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. किंवा महायुतीकडून त्याला महत्त्व दिलं जाऊ शकतं. दरम्यान सलग तीन टर्म पासून निवडून येणारे प्रशांत बंब यांचा देखील आत्मविश्वास जोरदार आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणारे प्रशांत बंब यांनी मतदारसंघातल्या विकासासाठी मोठा निधी मागच्या काळात खेचून आणला.
हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता
त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास जोरदार आहे . समोरून कुणीही आलं तरी आपल्याला फरक पडत नाही आपण चौथ्यांदा ही जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, शिवसेनेचे आमदार माने हे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले. मात्र 2009 ला प्रशांत बंब यांनी प्रथमच अपक्ष म्हणून इथली निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर 2014 ला भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली तेव्हा देखील बंब यांचा विजय झाला 2019 ला शिवसेना-भाजपची युती असताना प्रशांत बंब यांनी हा मतदारसंघ लढवला आणि हॅट्रिक करत जिंकून आणला. त्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण जाणून घेण्यात प्रशांत बंब आजपर्यंत यशस्वी झाले.
यावेळी मात्र त्यांच्या पुढे सतीश चव्हाण यांच आव्हान असणार आहे. मराठवाड्यामध्ये किंबहुना राज्यभरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे मराठा उमेदवार देऊन महाविकास आघाडीने आपला डाव साधला आहे, भाजप आता ओबीसीविरुद्ध मराठा असं वातावरण करतं का ? प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे.
हेही वाचा : ओल्ड पवारांचे यंग उमेदवार या विधानसभेला होणार आमदार ?
सतीश चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी दीर्घ आहे गेल्या दोन टर्म पासून ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे ते यावेळी लोकांच्या मधून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि त्यातच त्यांना शरद पवार यांच्या पक्षाची साथ असल्यामुळे यंदा सतीश चव्हाण प्रशांत बंब यांना टफ फाईट देतील अशी चर्चा मतदारसंघात होते आहे. दरम्यान गत वेळी या मतदारसंघात निवडणूक लढवणारे संतोष माने हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते. ते यंदाच्या निवडणुकीला प्रशांत बंब यांना साथ देतील असे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा स्टॅन्ड काय राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून बंडखोरी होणार नाही असे स्पष्ट केलं आहे.
जरांगे पाटील या मतदारसंघात आपला वेगळा उमेदवार देतात की सतीश चव्हाण यांना पाठिंबा देतात
या मतदारसंघात मराठा दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे आजवर प्रशांत बंब यांना दलित आणि मुस्लिम मताधिक्य मिळालेला आहे मात्र यावेळी राज्यात आणि मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असल्यामुळे मराठा समाजाची एक गठ्ठा मते ही सतीश चव्हाण यांच्या पारड्यात जाऊ शकतात, किंबहुना याच आशेने चव्हाण यांनी ही निवडणूक गंभीरपणे घेतली आहे. शिवाय मुस्लिम आणि दलित समाजही भाजपवर लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज असल्याचं आपल्याला दिसल. त्यामुळे या समाजाची मते देखील प्रशांत बंब यांच्याकडे जातात की सतीश चव्हाण यांना मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे शिवाय मराठा समाजाची निर्णायक मते असल्यामुळे मनोज जरांगे पाटील या मतदारसंघात आपला वेगळा उमेदवार देतात की सतीश चव्हाण यांना पाठिंबा देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान यापूर्वी सतीश चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे जात मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. आणि जरांगे यांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता. भाजप महायुतीकडून या मतदारसंघात काही मराठा नेत्यांना अपक्ष उभ करत मत विभागणी करण्याचा प्रयत्न करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
प्रशांत बंब यांच्याकडून आणखी काही मराठा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे केले जातात का ?
शैक्षणिक संस्थाच्या माध्यमातून सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघांमध्ये आपलं जाळ विणल आहे. त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेकांना जोडून ठेवण्यात चव्हाण यशस्वी झाले आहेत. या मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लिम मतदारांवर चव्हाण यांचे लक्ष असणार आहे तसेच प्रशांत बंब यांचा गड असणारा लासुर परिसर. या परिसरात देखील चव्हाण सध्या तळ ठोकून आहेत तसंच या परिसरातले प्रशांत बंब यांच्या सोबत असणारे कार्यकर्ते आपल्या सोबत कशा पद्धतीने येऊ शकतात, असं नियोजन चव्हाण यांच्याकडून होत आहे. मात्र या सगळ्यांमध्ये या मतदारसंघात बंडखोरी होते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे .
शिवसेनेचे कृष्णा पाटील डोणगावकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्ञानेश्वर नीळ हे दोन नेते या मतदारसंघासाठी इच्छुक होते आणि या नेत्यांनी त्यांची जमवलेली मतपेटी ही देखील या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. सतीश चव्हाण बंडखोरी रोखण्यात यश मिळवतात का ? तसंच प्रशांत बंब यांच्याकडून आणखी काही मराठा उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीत उभे केले जातात का ? या गोष्टीवर देखील इथलं राजकारण ठरणार आहे.
सरते शेवटी विद्यमान आमदार असल्यामुळे तसंच गेल्या तीन टर्म पासून या मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे प्रशांत बंब यांनी आपल्या मतदार संघात अनेक विकास काम राबवली आहेत त्यामुळे हा देखील त्यांच्यासाठी जमेचा मुद्दा आहे. याच विकास कामाच्या माध्यमातून ते लोकांना आपल्याला मतदान करण्याच आवाहन करू शकतात. आता या मतदारसंघात जातीय आधारित मतदारांमध्ये विभागणी होते का तसं करण्यात महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोण प्रयत्न करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.