कुप्रथेवर बोलणारा ‘कुरमाघर’ जपानी भाषेत
आदिवासी महिलांची सामाजिक परवड मांडणारा ‘कुरमाघर’ लघुपट जपानी भाषेत पोहचला आहे. या लघुपटातील प्रभावी सामाजिक भाष्य पाहून टोकीयो विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय अभ्यासकाने पुढाकार घेत जपानी भाषेत लघुपट पोहचवला आहे. औरंगाबादच्या युवा कलाकारांनी साकारलेली कलाकृती परदेशात पोहचली आहे.
आंतरराष्ट्रीय महोत्सव गाजवणारा अविनाश शेजवळ दिग्दर्शित ‘कुरमाघर’ हा हिंदी लघुपट जपानी भाषेत पोहचला आहे. कुप्रथेवर भाष्य करणारा हा लघुपट आहे. गडचिरोली जिल्ह्यात ‘कुरमाघर’ प्रथा असून माडिया जमातीत मासिक पाळीच्या काळात महिलांना पाच दिवस कुरमाघरात ठेवतात. या घरात महिलांना साप, अस्वच्छता आणि एकटेपणाचा सामना करावा लागतो. सामाजिक परंपरेचे ओझे असल्याने तरुणी आणि महिला कुरमाघरात राहतात. या समस्येवर लघुपटात भाष्य करण्यात आले आहे. त्याची परिणामकारकता पाहिल्यानंतर टोकीयो विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक मायचिको किकुची यांनी अविनाश यांच्याशी संपर्क साधून लघुपट जपानी भाषेतील सबटायटलसह प्रदर्शित करण्याची इच्छा व्यक्त केली. कुरमाघर प्रथा आणि त्याची दाहकता जपानमध्ये समाजावी हा निखळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार लघुपट दुसऱ्या भाषेतही पोहचला आहे.
देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला अविनाशने मुंबईत संगीत अल्बम आणि चित्रपटांसाठी काम केले आहे. ‘कुरमाघर’द्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. इटलीत इंटरनॅशनल ह्युमन एन्व्हायर्न्मेंट केअर फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कुरमाघर’ उपांत्य फेरीत पोहचला होता. मॉस्को शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये लघुपटाला नामांकन मिळाले होते. कॅलिफोर्निया, कॅनडा, जपान, बांग्लादेशसह भारतातील महोत्सवात ‘कुरमाघर’ची निवड झाली आहे. औरंगाबाद परिसरात लघुपटाचे चित्रीकरण झाले असून प्रांजल सुरडकर व पूजा गायकवाड यांची मुख्य भूमिका आहे. जपानी भाषेत चित्रपट प्रदर्शित होणे आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. पुढील प्रकल्प करण्यासाठी उत्साह वाढला आहे, असे अविनाशने सांगितले.