Manoj Jarange Factor in Assembly Election मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ जोरात, ४६ जागांचे चित्र बदलणार ?

३० तारखेला उमेदवार जाहीर होणार, Assembly Election

विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आहे. विशेषत: मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत जरांगे यांच्या सभा, बैठकांनी वातावरण ढवळून निघाले होते. परिणामी, मराठवाड्यात आठपैकी सात जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. आता मराठवाड्यात विधानसभेच्या ४६ जागा असून जरांगे पाटील किती जागा पाडतात आणि किती जागा लढतात याची चर्चा सुरू आहे. सध्यातरी मराठा आरक्षण, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी या प्रश्नांनी मराठवाड्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार व्यापला आहे. काही संस्थांनी केलेल्या पाहणीत हेच मुद्दे अधोरेखित झाले आहेत. विधानसभा निवडणूक ‘जरांगे फॅक्टर’ चालणार आणि सत्ताधारी पक्षाला हादला बसणार असल्याचे अनुमान आहे. सध्या मराठा आरक्षणकेंद्रीत भूमिकेतून कोणते उमेदवार द्यायचे याचा निर्णय तीन दिवसांनी घेतला जाणार आहे. पण, अंतरवाली सराटी गावाकडे सर्वपक्षीय नेत्यांची रिघ लागली आहे. जरांगे यांचा ‘आशिर्वाद’ घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करतानाचे फोटो ‘व्हायरल’ करण्यात नेते आघाडीवर आहेत. जरांगे यांनी अद्याप कुणालाच पाठिंबा दिला नसून कुणीही अपप्रचार करू नये आणि मतदारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे.

काय आहे मराठवाड्यातील मराठा आरक्षण आंदोलनाची आणि विधानसभा निवडणूक प्रचाराची सद्यस्थिती जाणून घेऊया…

मराठा आरक्षणाच्या मुदद्यावर मराठवाड्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षण आणि शेतीचे प्रश्न केंद्रस्थानी असल्याचे सामाजिकशास्त्राच्या संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष आहेत. महायुती सरकारने आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने हाताळला नसल्याने विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठवाड्यात ‘जरांगे फॅक्टर’ विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विषयाच्या आठ संशोधक विद्यार्थ्यांनी ‘सार्थक’अंतर्गत ३१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर या कालावधीत मराठवाड्यात सर्वेक्षण केले. एकूण साडेनऊशे सर्वेक्षण नमुने अभ्यासण्यात आले होते. त्यानुसार सद्यस्थितीत मराठा आरक्षण आणि शेतीचे प्रश्न हेच मुद्दे केंद्रस्थानी आहेत. राजकीय घडामोडींच्या अनुषंगाने हा अभ्यास करण्यात आला. जरांगे यांनी आंदोलनातून मराठा समाजाला संघटीत केले असून समांतर आंदोलनांनीही संघटन टिकून असल्याचे आढळले आहे. २९ सप्टेंबर २०२३ रोजी शहागड येथील आंदोलनातून जरांगे यांनी सुरू केलेला लढा अंतरवाली सराटी येथे उपोषण करुन राज्यभर पोहचवला. न्या. शिंदे समितीद्वारे हजारो कुणबी नोंदी शोधण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने मराठा समाजाला एसईबीसी प्रवर्गातून स्वतंत्र १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केला. परंतु सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी जरांगे यांची मागणी आहे. या मागणीचा जोर कायम असून संशोधकांच्या समूहाच्या सर्वेक्षणानुसार मराठा समाज जरांगे यांच्या मागे उभा आहे.

Manoj Jarange Factor in Assembly Election

कदाचित जरांगे राजकारणात उतरले तर त्याचे काय परिणाम होतील याची चाचपणी करण्यात आली. जरांगे मुख्यमंत्री असण्याला मराठा समाजापैकी ७५.५३ टक्के नागरिकांची सहमती आहे. या खालोखाल उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कमी प्रतिसाद असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला समाज नाकारू शकतो असे चित्र आहे. ८५.३० टक्के लोक महायुती सरकारच्या धोरणांवर नाराज असल्याचे दिसले. तसेच ६८.५६ टक्के समाज महाविकास आघाडीवर नाराज आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाचे २४.६७ टक्के लोकांनी समर्थन केले. ‘लाडकी बहिण योजना’ लागू असली तरी मराठा आरक्षण, शेतीचे प्रश्न व रोजगार हे मुद्दे प्रभावी असल्याचे संशोधकांचे निष्कर्ष आहेत. या निष्कर्षांमुळे प्रस्थापित पक्ष आणि नेते धास्तावले आहेत. जरांगे यांना भेटून पाठिंबा मिळविण्यासाठी गर्दी झाली आहे. जरांगे आपल्यासोबत आणि आपण जरांगे यांच्यासोबत असल्याचे सांगत आहेत.

हेही वाचा : भाजप कश्याच्या  जिवावर मराठ्यांना हलक्यात घेतय ?

–जरांगे पाटील यांची राजकीय भूमिका स्पष्ट

विधानसभा निवडणुकीत जरांगे यांनी उमेदवार उभे करावे असे ८३.४७ मराठा समाजाला वाटते. मराठा समाजाचे प्रश्न सरकारने व्यवस्थित हाताळले नसल्याने लोकसभेप्रमाणे विधानसभेतही बसू शकतो. जरांगे यांनी दसरा मेळावा घेऊन केलेल्या शक्तिप्रदर्शनाचा राज्यभर प्रभाव पडला आहे. या मेळाव्यातून जरांगे यांनी आपल्या पाठिंशी उभे राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गावोगावी बैठका घेऊन जरांगे ठरवतील त्याच उमेदवाराला मतदान करण्याचा निर्णय गावकरी घेत आहेत. महायुतीच्या नेत्यांना गावागावात विरोध सुरू झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीच्या मातब्बर नेत्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

—जरांगे ३० ऑक्टोबर रोजी उमेदवार जाहीर करणार

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे इच्छूक उमेदवारांची बैठक बोलावली होती. काही इच्छुकांनी बैठकीतील छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारीत करुन उमेदवारी निश्चित झाल्याचा प्रचार सुरू केला आहे. परंतु, अद्याप कुणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नाही. जरांगे स्वत: उमेदवारांची नावे जाहीर करणार आहे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे समन्वयक सुनील कोटकर यांनी केले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती. परंतु, राज्य सरकारने जरांगे यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. त्यामुळे, जरांगे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उमेदवार उतरवणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे गुरूवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघातील इच्छूकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर काही इच्छुकांनी चर्चेची छायाचित्रे प्रसारीत केली. त्यातून उमेदवारी निश्चित झाल्याचा प्रचार सुरू केला आहे. सर्वांना उमेदवारी अर्ज भरण्यास जरांगे यांनी सांगितले आहे. ३० ॲाक्टोबर रोजी जरांगे मतदारसंघ आणि उमेदवार घोषित करणार आहेत. त्यामुळे, इतर सर्व अफवा असल्याचे कोटकर यांनी म्हटले आहे.

वर्षभरापासून मराठा आरक्षण व मनोज जरांगे मराठवाड्यातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत. आरक्षण चळवळीचे यशापयश व राजकीय सद्यस्थितीचे अवलोकन करण्यासाठी सर्वेक्षण केले. विधानसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आणि शेतीचे मुद्दे चर्चेत असतील. – अजय पवार, संशोधक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *