ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

वैचारिक आणि ललित लेखन क्षेत्रात साहित्यिक व माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे भरीव योगदान आहे. चपळगावकर यांची वर्धा येथील ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीचे मराठवाड्यातील साहित्य वर्तुळातून स्वागत करण्यात आले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चपळगावकर यांची एकमताने निवड करण्यात आली. पाच दशकांपेक्षा अधिक काळापासून चपळगावकर लेखन करीत आहेत. हैदराबाद मुक्तिसंग्रामावर विपुल संशोधनात्मक लेखन केले आहे. २००४ मध्ये माजलगाव येथे झालेल्या २६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, नववे जलसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष चपळगावकर होते. ‘भैरूरतन दमाणी पुरस्कार’, महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, राज्य शासनाचे वाड्मय पुरस्कार अशा प्रतिष्ठीत पुरस्कारांनी चपळगावकर यांचा सन्मान झाला आहे. नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. पं. जवाहरलाल नेहरू, स्वामी रामानंद तीर्थ आणि पत्रकार अनंत भालेराव यांची चरित्रे आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनातील महत्त्वाच्या माणसांची व्यक्तिचित्रे लिहिणारे अभ्यासक अशी त्यांची ठळक ओळख आहे.
 
—चपळगावकर यांची पुस्तके

चपळगावकर यांनी प्रामुख्याने इतिहास, वैचारिक, ललित प्रकारातील लेखन केले आहे. ‘सावलीचा शोध’, ‘मनातली माणसं’, ‘महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’, ‘टिळक गांधी : नेतृत्वाची सांधेजोड’, ‘आठवणीतले दिवस’, ‘त्यांना समजून घेताना’, ‘अनंत भालेराव – काळ आणि कर्तृत्व’, ‘तीन न्यायमुर्ती आणि त्यांचा काळ’, ‘न्यायमुर्ती केशवराव कोरटकर’ (संपादन), ‘संघर्ष आणि शहाणपण’, ‘न्यायाच्या गोष्टी’, ‘दीपमाळ’, ‘राज्यघटनेचे अर्धशतक’ अशी त्यांची २७ पुस्तके प्रसिद्ध आहेत. 

——
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे हा आपण केलेल्या लेखनाचा सन्मान असतो. तसेच पुढील कामाची आपल्याकडून अपेक्षाही असते. भाषाविषयक विचार मांडण्याची मला संधी मिळाली आहे.  
नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ साहित्यिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *