विक्रमवीर शुभमन Shubman Gill hits 208

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामन्यात द्विशतक करणारा शुभमन गिल हा सर्वांत तरुण खेळाडू ठरला आहे.


न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याने द्विशतक झळकावून उत्कृष्ट फलंदाजी केली.
हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गिलने न्यूझीलंडविरुद्ध केवळ 149 चेंडूंत 208 धावा केल्या.

या पराक्रमासह, हा 23 वर्षीय क्रिकेटपटू दुहेरी शतक झळकावणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत सामील झाला आहे.
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि इशान किशन यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुहेरी शतके करणारा तो केवळ पाचवा खेळाडू आहे.

गिलने न्यूझीलंडच्या सर्वच गोलंदाजांना धो- धो धुतले आणि वन-डेतील आपले पहिले द्विशतक ठोकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद एक हजार धावा पूर्ण करणारा तो भारतीय फलंदाज ठरला आहे.

नुकतीच टीम इंडियाच्या संघात खेळण्याची संधी मिळालेल्या पंजाबच्या आश्वासक फलंदाजाचे हे तिसरे शतक आहे.

गिलने श्रीलंकेच्या मालिकेतील अंतिम सामन्यातसुद्धा शतक झळकावले होते आणि बुधवारीही पहिल्या वन-डे सामन्यात दुहेरी शतक झळकावले आहे.

हैदराबाद येथील सामन्यातील या दुहेरी शतकासह गिलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील केवळ 19 डावांमध्ये तिसरे शतक ठोकले आहे.

रोहित शर्मासह गिलने सुरुवातीला डावाची धुरा सांभाळली पण कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला, त्यानंतर विराट कोहली आणि इशान किशन हे दोघेही झटपट बाद झाले.

गिलच्या या तुफानी द्विशतकीय खेळीमुळे, हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममधील उत्साही गर्दीने त्याच्यासाठी उभे राहून स्टॅंडिंग ओव्हेशन देखील दिले. सोशल मीडियावर देखील अभिनंदनाच्या मेसेजचा धडाका लावला आहे. ट्विटरवरसुद्धा पोस्टने जागा भरून गेली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *