Vidhansabha election 2024 कुणी तिकीट घेतं का रे तिकीट ?
महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या सर्व मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचे सूत्र मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. न महायुती न महाविकास आघाडी कुणाचेही जागावाटप अद्यापही फायनल झालेलं नाहीये. मतदार संघातली ताकद आणि क्षमता असलेल्या उमेदवार ज्यांच्याकडे आहे, पारंपारिक जागा जे लढवत आलेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार तिकीट वाटपात होणार असल्यास सांगितलं जात आहे. महायुतीमध्ये भाजप 160 ते 180 जागा लढवणार असल्याचे सांगितलं जातंय. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या कडे शिवसेना फुटी नंतर 40 आमदार गेले होते. त्यामुळे विद्यमान असणाऱ्या चाळीस आमदारांची तिकीट अधिक 40 मतदारसंघासाठी जागा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून मागितल्या जात आहेत. त्यामुळे एकूण 80 ते 100 जागा शिंदे सेना मागते आहे. अजित पवारांसोबत असणारे विद्यमान चाळीस आमदार तसेच राष्ट्रवादीने 2019 मध्ये लढवलेल्या बहुतेक जागांवर उमेदवारीची मागणी अजित पवारांकडून होते आहे. त्यामुळे महायुतीत जागावाटप नेमकं कसं ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाद होताना दिसतात, लोकसभा निवडणुकीला शिवसेना ठाकरे गटाने सर्वाधिक जागा लढवल्या होत्या. विधानसभेला मात्र काँग्रेस पक्षासोबत त्यांचे वाद होताना दिसत आहेत. अनेक पारंपारिक जागांवर दोन्ही पक्षाचे उमेदवार लढण्यासाठी ठाम आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे जागावाटप लवकर ठरेल असं वाटत नाही. शिवसेना फुटी नंतर 40 आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. तर 16 आमदार उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिले होते. 2019 ला शिवसेना अखंड असताना 56 जागांवर विधानसभेला त्यांनी विजय मिळवला होता. त्यातलेच 40 जण एकनाथ शिंदें सोबत गेले. यंदाच्या विधानसभेला 100 जागा लढवण्याचा मानस ठाकरेंच्या शिवसेनेकडून होतो आहे. मात्र जे 40 आमदार एकनाथ शिंदे सोबत गेले, त्या जागांवर नेमके उमेदवार कोण असतील. तेवढे उमेदवार उद्धव ठाकरेंनी मिळवण्यात यश मिळवला आहे का? आणि ते तितक्या ताकतीचे उमेदवार असतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठाकरेंना सोडून गेलेल्या 40 जागा अर्थात 40 आमदारांच्या विरोधात ठाकरेंकडून नेमकी कुणाला उमेदवारी देण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यातच या 40 जागांवर लढण्यासाठी ठाकरेंना उमेदवार मिळत नसल्याची चर्चा आहे. आता ही चर्चा किती खरी आहे खोटी आहे, याचा मात्र आपल्याला शोध घ्यावा लागेल. की महायुतीकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या सेनेकडून या बातम्या पसरवल्या जातात, अशी एक दुसरी शक्यता आहे.
सहाजिकच 2019 ला जिंकलेल्या 56 जागांवरचे उमेदवार अधिक 40 ते 50 लढवलेल्या इतर जागांवर ठाकरेंकडून चाचणी होते आहे. महाविकास आघाडीचा मित्रपक्ष म्हणून 100 जागांच्या आसपास जागा ठाकरेंच्या शिवसेनेला सुटतील, 100 ते 110 जागा काँग्रेस पक्ष लढवेल तर 70 ते 80 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देण्यात येतील असं सांगितलं जात आहे.
मात्र, काँग्रेस पक्षाचा विचार केल्यास राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून लढवण्यासाठी देखील अनेक इच्छुक शरद पवारांच्या भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादी फुटी नंतर शरद पवारांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याचेच परिणाम आपल्याला लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले, 10 जागा लढवत तब्बल आठ जागांवर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाने विजय मिळवला. त्यामुळे विधानसभेमधला स्ट्राईक रेट देखील चांगला राखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून होईल असं सांगितलं जात आहे. काँग्रेस पक्षाने ही महाविकास आघाडी कडून सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. दलित आणि मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्यात काँग्रेस यशस्वी झाली, त्यामुळे काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास ही जोरदार आहे. आणि इच्छुकांची संख्या देखील मोठी आहे.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 21 जागा लढवत नऊ जागांवर विजय मिळवला. पक्ष फुटल्याची सहानुभूती उद्धव ठाकरेंना जास्त मिळाली. लोकसभा क्षेत्राचा विचार करता त्यावेळी, इच्छुकांची संख्या आणि महाविकास आघाडीचे समीकरण मतदारांना पटलं होतं. राज्यात मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यासारखे मोठे प्रश्न आहेत. त्यामुळे महायुतीसमोर जरांगे पाटलांनी आव्हान निर्माण केला आहे. मराठवाडा आणि लगतच्या काही परिसरात महायुतीला फटका बसला सांगितलं जात आहे. जरांगे पाटलांनी स्वतः काही उमेदवार दिले नाही, तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला निश्चित होईल, आणि लोकसभेची पुनरावृत्ती राज्यात होईल असं बोललं जातय.
आजच्या घडीला विधानसभा मतदारसंघासाठी, मतदारसंघाचा असणारा आकार पाहता, उमेदवार अनेक असतात. एकाच पक्षात दोन दोन तीन तीन इच्छुक असतात. अशावेळी कुणा एकाला तिकीट देत, दुसऱ्याची बंडखोरी रोखणं हे देखील मोठ्या आव्हान असतं.
सद्यस्थितीला उद्धव ठाकरे यांच्याकडे 16 आमदार आहेत. त्यामुळे या आमदारांना पुन्हा एकदा यंदाच्या विधानसभेला तिकीट देण्यात येईल, हे जवळपास निश्चित आहे. मात्र सोडून गेलेल्या 40 आमदारांच्या जागांवर तेवढ्या प्रमाणात ताकतवान उमेदवार देण्यात ठाकरे यशस्वी होतील का? हाही एक प्रश्न आहे. याच 40 आमदारांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरेंकडे उमेदवार नसल्याचं बोललं जातंय, तशी चर्चा माध्यमांमधून होते आहे. त्यामुळे जागा वाटपाच्या मुद्द्यावर ठाकरेंचे काँग्रेससोबत वाद होत असले तरी, जागा वाटपानंतर ठाकरे उमेदवार कुठून आणणार. मिळालेला उमेदवार तेवढा ताकतवान असेल का असेही प्रश्न मोठे आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडी कडून सर्वात कमी जागा लढवून, त्या जिंकून आणण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं जात आहे. समीकरणा नुसार ज्यांच्याकडे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे या पक्षांना सर्वाधिक उमेदवार देत, सर्वाधिक जागा लढवत, जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्याचा प्रयत्न होतो आहे. कारण तेव्हाच मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला मिळेल. दुसरीकडे महायुतीकडून मुख्यमंत्री पदावर हक्क भारतीय जनता पक्षाने दाखवला आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चा होते आहे. तर महाविकास आघाडी कडून मुख्यमंत्री हे पद जिंकून येणारा जागांवर ठरेल अशी चर्चा आहे. आणि त्याचमुळे सर्वाधिक जागा आपल्या पदरात पाडून घेऊन, त्या जिंकून आणणं हे तिन्ही पक्षांना मोठं आव्हान असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना तेवढे तगडे उमेदवार मिळवण्यात यश मिळेल का? तसंच उद्धव ठाकरेंच्या साधारण किती जागा जिंकून येतील, याबद्दल आम्हाला नक्की कळवा.