Who will stop Ghansawangi Tope ? घनसावंगीत टोपेंचा ‘षटकार’ कोण रोखणार ?
उढान, घाडगे, अर्दड यांची जोरदार फिल्डींग
राज्याच्या राजकारणात कितीही घराणेशाहीचा आरोप होत असला तरी, राजकारणी घराणे आजही आपले सत्तास्थाने टिकवून आहेत. याच घराण्यांना विरोध करण्यासाठी अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात येत असतात, मात्र आपला डाव जिंकण्यात ही घराणी यशस्वी होत आली आहे. भाजप शिवसेना या पक्षांनी तळागाळातील कार्यकर्ता, सर्वसामान्य रिक्षा चालक, टपरी चालक अशा पद्धतीच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीचे तिकीट देत, त्यांना महत्त्वाची पद दिली. मात्र काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांचा विचार केल्यास या दोन पक्षांमध्ये घराणेशाही मोठ्या प्रमाणात असल्याच आपण पाहत आलो आहोत. मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे लातूर जिल्ह्यातील देशमुख असतील, नांदेडचे चव्हाण घराण असेल, उस्मानाबाद मध्ये पाटील घराणे असेल, किंवा जालन्यामध्ये टोपे कुटुंब असेल आदी मातब्बर घराणे राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटवून आहेत. आज आपण जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी मतदार संघाचे आमदार राजेश टोपे यांच्या राजकीय वाटचालीची माहिती जाणून घेणार आहोत.
Who will stop Ghansawangi Tope ?
राजेश टोपे हे सध्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार आहेत. राष्ट्रवादी फुटी नंतर त्यांनी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील त्यांच्या पक्षाच त्यांनी काम केल्याचं आपण पाहिलं. कारखानदारी शैक्षणिक संस्था या माध्यमातून मतदार संघामध्ये त्यांनी, एक प्रकारे जाळ निर्माण केलं आहे. आणि त्यातून कार्यकर्त्यांची फौज टिकून ठेवण्याचं काम देखील, टोपे यांनी केल आहे. शैक्षणिक संस्था हे सगळं असतानाही, कोणत्याही चौकशी संस्थेचा ससे मीरा टोपे यांच्यावर नाही. ईडी ,CBI या संस्थेच्या कोणत्या चौकशीमध्ये टोपे यांचे नाव नाही किंवा, त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप देखील झालेले नाहीत. त्यामुळे त्यांनी शरद पवार यांची साथ सोडत सत्ताधारी पक्षाकडे जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला नसावा असं म्हटलं जात आहे.
टोपे यांना यंदाची निवडणूक जड जाईल ?
राजेश टोपे हे गेली पाच टर्म पासून आमदार आहेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये आणि महाविकास आघाडीचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी काम केलं आहे. वडील दिवंगत अंकुशराव टोपे हे देखील जालनाचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे टोपेंना मोठी राजकीय पार्श्वभूमी असल्याचा आपल्याला पाहायला मिळते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजेश टोपे हे सहाव्यांदा निवडणुकीत उभे राहतील. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी टोपे यांना घनसावंगी मतदारसंघांमध्ये प्रबळ विरोधक नसल्याचे बोलले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकी वेळी शिवसेनेचे उमेदवार हिकमत उडान यांनी टोपे यांना मोठ आव्हान निर्माण केलं होतं. त्यावेळी टोपे यांचा निसटता विजय झाला होता. त्यामुळे तेव्हाच टोपेंच्या राजकिय साम्राज्याला उडान यांनी मोठ आव्हान निर्माण केल असून, आगामी काळात उडान हे टोपेना चितपट करू शकतील, असं बोललं जात होतं. मात्र, टोपे यांनी शरद पवारांशी एकनिष्ठ राहात, आपल्या पक्षाचे काम केलं. आरोग्य मंत्री म्हणून असताना जालना जिल्ह्यासाठी आणि त्यांच्या घनसावंगी मतदार संघासाठी अनेक महत्त्वाची विकास काम केले. त्यामुळे विरोधकांवर कोणतेही कॉमेंट न करणारे किंवा राजकीय स्टंटबाजी न करणारे नेते म्हणून टोपे यांच्याकडे पाहिलं जातं.
सतीश घाटगे की हिकमत उडान तिकीट कोणाला ?
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये घनसावंगी मतदारसंघात टोपे यांच्या विरोधात साखर कारखान्याच्या रूपाने कारखानदारी करणारे सतीश घाटगे हे भाजपचे उमेदवार होऊ शकतात अशी चर्चा आहे. त्यासोबतच सध्या ठाकरे गटात असणारे हिकमत उडान सध्याच्या परिस्थितीत तरी ठाकरेंसोबत आहेत, मात्र ऐन निवडणुकी वेळी त्यांनी शिंदे गटात जर प्रवेश केला, तर ते देखील पुढे आव्हान निर्माण करू शकतात. सोबतच मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून नुकतेच निवृत्त झालेले मधुकर राजे अर्दड हे देखील विधानसभेसाठी इच्छुक असून, मतदारसंघाची बांधणी करायला त्यांनी सुरुवात केली आहे. कार्यकर्ते सोबत घेत मतदार संघाचा ते सध्या दौरा करत आहेत. त्यामुळे या नेत्यांचं टोपेंना यंदा आव्हान ठरू शकतं असं बोललं जात आहे. टोपे यांची राजकारण करण्याची पद्धत काहीशी सभ्य असल्याचं बोललं जातं. आपल्या कार्यकर्त्यांची कामे करणे, मतदारसंघातल्या विकास कामांबद्दल सातत्याने पुढाकार घेणे, यासाठी टोपे हे सत्ताधाऱ्यांशी देखील योग्य संवाद राखून असतात. आजच्या घडीला राष्ट्रवादी शरद पवार पक्षात त्यांचे मोठे स्थान आहे. शरद पवार, जयंत पाटील, आदी मोठ्या नेत्यांचे विश्वास म्हणून टोपे राज्यभर आपल्याला राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसतात.
हेही वाचा : जरांगे फॅक्टरचा मराठवाड्यात सर्वाधिक कोणाला धोका ?
सतीश घाटगे यांनी देखील मतदार संघात बांधणी करायला सुरुवात केली असून, साखर कारखान्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांच्या ते संपर्कात असतात, सध्या भारतीय जनता पक्षात त्यांनी प्रवेश केला असून,ते भाजपचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. राजेश टोपे हे गेली पाच टर्म पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे, त्यांना मतदारसंघाची कार्यकर्त्यांची, चांगली जाण आहे. शिवाय कार्यकर्ते बांधून ठेवण्यात त्यांनी यश मिळवलेल आहे. मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटीचा टोपे यांच्या मतदारसंघात समावेश होतो. तसेच मराठा आरक्षण आंदोलनामध्ये टोपे यांनी सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच समर्थन केल असून, आंदोलनासाठी त्यांनी मदत केल्याचं जग जाहीर आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचा त्यांना विरोध नसल्याचा दिसत आहे. त्यामुळे मराठा समाज आणि जरांगे यांचे कार्यकर्ते टोपे यांच्या विरोधात बोलत नाहीत. जरांगे यांनी ज्या पद्धतीने भाजपवर टीका करायला सुरुवात केलेली असून, भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात ते प्रचार राज्यभरात, मराठवाड्यात करू शकतात, त्यामुळे सहाजिकच घनसावंगी या मतदारसंघात देखील ते महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात काम करतील अशी शक्यता आहे, याचा फायदा थेट टोपेंना होण्याची शक्यता असून, विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात टोपे यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण राहील यावर देखील इथलं राजकारण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात अनेक पक्षाचे नेते टोपे यांच्या विरोधात असले तरी, टोपेंना यंदाची निवडणूक जड जाणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.