Why is the BJP taking the Marathas lightly भाजप कश्याच्या जिवावर मराठ्यांना हलक्यात घेतय ?
Why is the BJP taking the Marathas lightly
हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपने जिंकली. शेतकरी आंदोलन, कुस्तीपटूच आंदोलन या पार्श्वभूमीवर हरियाणात भाजपला फटका बसेल असे विश्लेषण करण्यात येत होतं. भाजपचे सहकारी असणाऱ्या पक्षांनी सुद्धा हरियाणात भाजपची साथ सोडली होती. एकूणच वातावरण भाजपच्या विरोधात होतं, भाजपसाठी प्रतिकूल होतं असं असूनही भाजपने मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचा वातावरण आहे. एकूणच भाजपचे नेते या विजयामुळे जबरदस्त आत्मविश्वास बाळगून आहेत. दुसरीकडे हरियाणातल्या पराभवामुळे काँग्रेस नेत्यांचे खच्चीकरण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे. या पराभवाचे खापर काँग्रेस कुणावर फोडते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Why is the BJP taking the Marathas lightly
हरियाणातल्या या विजयामुळे महाराष्ट्र भाजपही आनंदात आहे आणि येणाऱ्या विधानसभेसाठी आत्मविश्वास बाळगूनही आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झालेला महाराष्ट्रातला जबरदस्त पराभव, त्यामुळे भाजपच्या नेत्यांना पळता भुई थोडी झाली होती. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपच्या नेत्यांना टीकेला सामोरे जावं लागलं होतं. महायुतीला सर्वाधिक फटका हा तेव्हा मराठवाड्यात बसला होता. भाजपची एकही जागा मराठवाड्यात निवडून आली नव्हती. मनोज जरांगे पाटील यांनी उभ केलल आंदोलन, मराठा आरक्षणाचा प्रश्न, शासनाकडे केलेली मागणी, आणि राज्यकर्त्याचं दुर्लक्ष, ज्यामुळे मराठा समाज भाजपसह महायुतीवर चांगलाच नाराज होता. . काहीच दिवसात महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका लागतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह, अमित शहा, भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव आदी भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्र दौरे केले, आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणही केलं. तसंच पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मतदारांना आवाहन केलं.
अमित शहा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर येऊन गेले
अमित शहा संभाजीनगरच्या दौऱ्यावर येऊन गेले, हा दौरा विशेष गाजला. या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार या महायुतीच्या नेत्यांची बैठक घेत, महायुतीला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची चर्चा केली. मराठवाड्यामध्ये भाजपला 30 जागा निवडून आणण्याचा आवाहन केलं. किंबहुना आम्ही 30 जागा जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त केला. अमित शहा यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. मराठवाड्यात येऊन मराठा समाजाच्या नाकावर टिचून, आम्ही 30 जागा जिंकून आणू, असा सूर शहा यांच्या भाषणातून जाणवल्याच विश्लेषण अनेक राजकीय विश्लेषकांनी केलं. यावर उलट सुलट प्रतिक्रिया देखील व्यक्त करण्यात आल्या. त्यामुळे शहा यांना हा आत्मविश्वास कुठून येतो, अशी भाषा शहा कशी करू शकतात? असेही प्रश्न मराठा कार्यकर्त्यांकडून उपस्थित झाले? सोशल मीडियावरही त्याची चर्चा झाली. राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अगदी मागच्या आठवड्यापर्यंत आपल्या मागण्यांसाठी उपोषण केलं. शासनाला विनंती केली, आचारसंहितेपूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, असं जरांगे यांनी आवाहन केलं. मात्र या आवाहनाचा परिणाम शासनावर कुठेही जाणवत नाही. उलट गुजरात हरियाणा, दिल्ली सारख्या प्रदेशामध्ये शेतकऱ्यांचे झालेले अनेक आंदोलन दाबवण्यात भाजपाला यश आलेल आहे, त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा हे आंदोलन कशा पद्धतीने दुर्लक्ष करायचं, निष्प्रभ करायचं याची टेक्निक भाजपकडे आहे, असाही आत्मविश्वास भाजप नेत्यांमध्ये दिसून येतो.
BJP taking the Marathas lightly
त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच आंदोलनहीं आमच्यावर काही परिणाम करणार नाही, अशी व्यवस्था आम्ही करू, असं शहा यांना म्हणायचं तर नाही ना, असा अर्थ शहा यांच्या भाषणातून काढण्यात आला. सद्यस्थितीला भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी महायुतीची युती आहे. या तिन्ही पक्षांमध्ये असणाऱ्या मराठा नेत्यांची संख्या मोठी आहे. शिवाय ओबीसी नेतेही, अनेक आहेत. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात ओबीसींनी आंदोलन उभारलं होतं, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी मागणी, या ओबीसी नेत्यांनी केली. त्यात छगन भुजबळ, गोपीचंद पडळकर, लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे अशा नेत्यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या आंदोलनामुळे जरांगे पाटलांच आंदोलन प्रभावित करण्यास भाजपने काही प्रमाणात प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे.
जरांगे फॅक्टरचा मराठवाड्यात सर्वाधिक कोणाला धोका ?
अर्थात या आंदोलनामुळे ओबीसी समाज BJP कडे झुकवण्यात काहीस यश भाजपने मिळवल आहे. त्यामुळेच भाजप नेत्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ताकतीने सामोरे जाण्याचा प्रबळ विश्वास आहे. जरांगे पाटलांनी अनेकदा भाजप महायुतीवर टीका केली. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी अनेक आरोप केले. ओबीसी आंदोलन उभारण्यात फडणवीस यांचा हात आहे. असेही जरांगे म्हणाले. त्यांनी त्यांच्या भाषणातून भाजपला आणि फडणवीस यांना टार्गेट करायला सुरुवात केली. त्यानंतर भाजपा मधले अनेक नेते पुढे आले, त्यांनी जरांगेंवर टीका केली. यात नारायण राणे, नितेश राणे, प्रसाद लाड, शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र राऊत. या नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जरांगे यांच्या आंदोलनावर टीका केली. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे उदयनराजे भोसले हे सध्या भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जरांगे यांचं महत्त्व कसं कमी होईल, यासाठी भाजपने प्रयत्न केल्याचं सांगितलं जात आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मार्फत नरेंद्र पाटील यांनी मराठवाड्यात अनेक ठिकाणी मिळावे घेत सरकार मराठा समाजासाठी, मोठे प्रयत्न करत असल्याचे सांगितलं. त्यामुळे नरेंद्र पाटील यांनीही भाजपची काहीशी बाजू घेतल्याचे म्हटलं जात आहे.
राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहिणी योजना, या माध्यमातूनही महिला मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न महायुतीकडून होतो आहे. ही योजना लोकप्रिय करण्याचा प्रयत्न महायुतीचे नेते करतायेत. त्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठे मिळावे घेण्यात आले. हे देखील एक कारण महायुती आणि भाजपला विधानसभेला यश मिळवून देण्यात मदत करतील, अशी अपेक्षा भाजपा कडून व्यक्त होते आहे. जरांगे पाटलांनी नुकतच बीड जिल्ह्यातल्या नारायण गडावर भव्य दिव्य असा दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी मराठा समाजाला उठाव करावाच लागेल, असं आवाहन समाजाला केलं. ज्या पद्धतीचा समाज जरांगेनी जमवला, त्यावरून मराठवाड्यामध्ये मराठा समाज महायुतीच्या विरोधात जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे. असं असताना भाजप नेते तीस जागा जिंकण्याचा स्वप्न कसं काय पाहत असतील, असाही प्रश्न राजकीय विश्लेषक करत आहेत. जरांगे आणि मराठा समाजाची नाराजी कशी दूर होईल, यासाठी प्रयत्न न करता, उलट आंदोलन असतानाही आम्ही 30 जागा जिंकू, असा भाजपाचा आत्मविश्वास आहे.
एकूणच याचा अर्थ हरियाणाच्या विजयामुळे, तसेच महायुतीतल्या मराठा नेत्यांमुळे, लाडकी बहीण यासारख्या लोकप्रिय योजनांमुळे, आणि उभा केलेल्या ओबीसी आंदोलनामुळे, काही राजकीय गणित साधण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. आणि या गणितामुळे जरांगे पाटलांचा प्रभाव, दूर करण्यात भाजपाला यश मिळेल अशी अपेक्षा भाजपला वाटते आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात आणि राज्यभरात मराठा बहुल मतदारसंघात, भाजपला फटका बसतो, की ओबीसी आणि इतर समाजाच्या मतदानावर भाजप जागा जिंकून आणतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, शिवाय तितकच इंटरेस्टिंगही असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, जरांगेंच्या आंदोलनाचा महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.