Will Pritam Munde contest the Assembly from this constituency ? प्रीतम मुंडे या मतदासंघातुन विधानसभा लढणार ?
प्रीतम मुंडे विधानसभेच्या रिंगणात उतरतील ?
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून अनेक विद्यमान आमदार आणि विविध पक्षाचे नेते सध्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत. तर अनेक इच्छुक नेते हे आपला मतदार संघ शोधत आहेत. महायुती, महाविकास आघाडी, स्थानिक समीकरण, पक्षांतर्गत स्पर्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करता, मतदार संघाचा शोध घेताना अनेक नेत्यांची दमछाक होत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक विद्यमान खासदारांचे महायुतीने तिकीट कापले होते. त्यात बीडच्या तत्कालीन खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे यांचही तिकीट कापत पंकजा मुंडे यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यामुळे प्रीतम मुंडे यांना पक्षाने काहीसं बाजूला केल्याची चर्चा होती. मात्र त्याचवेळी डॉक्टर प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन केलं जाईल, असं भाजपचे अनेक नेते आणि स्वतः पंकजा मुंडे याही म्हणाल्या होत्या.
भाजपकडून त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवल जाण्याची दाट शक्यता आहे
पक्ष त्यांच्यावर अन्याय करणार नाही असेही, त्यांनी वक्तव्य केलं होतं. पुढे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. त्यावेळी बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि वंजारी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली होती. त्यातून अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मग पुढे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं, अशा पद्धतीचा घटनाक्रम आपण मागच्या काळात पाहिला. मात्र भाजपासाठी मोठ्या प्रमाणात योगदान देणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलींना राजकारणात संघर्ष करावा लागतो आहे, असंच काहीसं चित्र बदल्या काळात होतं. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी परळी मतदारसंघ सोडल्यामुळे आता मलाच मतदारसंघ राहिला नसल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली होती, तेव्हा प्रीतम मुंडे या कोणत्या मतदारसंघातून उभे राहतील अशा पद्धतीचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर प्रीतम मुंडे या मतदारसंघाच्या शोधात असल्याच्या बातम्या येत आहेत. दोन वेळा खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांना संसदीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे, खासदार म्हणून मतदार संघात त्यांनी केलेले कामं, कार्यकर्त्यांची फळी याचाही त्यांना चांगला अनुभव आहे. त्यामुळे भाजपकडून यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीमध्ये उतरवल जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र मतदारसंघ कोणता असेल याबद्दल सध्या काही ठरलेलं नाही.
तसं पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये सध्याचं महायुतीचे चित्र पाहता प्रीतम मुंडे बीड जिल्ह्यात उभे राहण्याची शक्यता कमी आहे. पंकजा मुंडे यांचा जो मतदारसंघ होता तो परळी मतदारसंघ, तिथं महायुतीकडून धनंजय मुंडे हे उमेदवार असणारे हे निश्चित आहे. त्यामुळे अहमद नगर जिल्ह्यामधल्या पाथर्डी शेवगाव या मतदारसंघाचा विचार डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून केला जात असल्याच्या बातम्या येत आहेत. या मतदारसंघातल्या विद्यमान आमदार आहेत, मोनिका राजळे. हा मतदारसंघ निवडण्यामागे किंवा या मतदारसंघात प्रीतम मुंडे यांची चर्चा होण्यामागे या मतदारसंघात असणारा ओबीसी समाज, आणि विशेष म्हणजे वंजारी समाजाची असणारी संख्या याच कारणासाठी प्रीतम मुंडे या मतदार संघाची निवड करू शकतात, असं बोललं जात आहे. याच पाथर्डी शेवगाव मतदार संघावर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे देखील विशेष लक्ष होतं, ते परळी प्रमाणेच पाथर्डी शेवगाव मतदार संघावर प्रेम करायचे, आणि अर्थातच या मतदारसंघातील कार्यकर्ते मतदार हे देखील मुंडे यांना मोठ्या प्रमाणात मानायचे.
इथे वंजारी आणि ओबीसी समाज मोठ्या संख्येत आहे
यानंतरचा आणखी एक महत्त्वाचा मतदार संघ जिथे प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे तो म्हणजे. परभणी जिल्ह्यातला गंगाखेड मतदार संघ.इथे विद्यमान आमदार आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे. गुट्टे आणि मुंडे परिवाराचे संबंध पाहता, हा मतदारसंघ आपण पंकजा मुंडे यांच्यासाठी सोडू शकतो अशा पद्धतीचा वक्तव्य देखील, मागच्या काळात आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केलं होतं. इथेही वंजारी आणि ओबीसी समाज मोठ्या संख्येत आहे.
त्यामुळे याही मतदारसंघात प्रीतम मुंडे यांच्या नावाची सध्या चर्चा आहे. यानंतर बीड जिल्ह्यातला माजलगाव हा मतदारसंघ देखील प्रीतम मुंडे यांच्यासाठी अनुकूल मानला जातो. त्यामुळे इथेही त्यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना जवळपास एक हजार मतांचे लीड होतं. त्यामुळे महायुतीची मतदारसंघात ताकत असल्याची बोलले जाते. यानंतर बीडमधलाच आष्टी हा मतदारसंघ देखील मुंडे यांच्यासाठी महत्त्वाचा मानला जातो, त्यामुळे या मतदारसंघात देखील मुंडे उभा राहू शकतात अशा काही चर्चा आहेत. पंकजा मुंडेंना या मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं. त्यामुळे भाजप आणि महायुतीसाठी हा मतदार संघ देखील मुंडे यांच्यासाठी सेफ मतदारसंघ ठरू शकतो. यानंतर बीडमधला गेवराई या मतदार संघात भाजपचे लक्ष्मण पवार हे आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा देखील प्रीतम मुंडे यांच्यासाठी विचार होऊ शकतो. त्या पद्धतीची चाचपणी होत असल्याचं बोललं जात आहे. त्यातच विद्यमान आमदार पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितल्याने, या चर्चांना जास्तच उधाण आलं आहे.
हेही वाचा : गेवराईमध्ये लक्ष्मण पवार अपक्ष लढणार
मात्र, अगदी तरुण वयात दोन टर्म खासदार राहणाऱ्या प्रीतम मुंडे, विधानसभेच्या रिंगणात उतरतात का ? मतदारसंघाच्या शोधासाठी बीड जिल्हा सोडून इतर जिल्ह्यातला मतदारसंघ शोधतात का? आणि शोधलेला मतदार संघ मराठा विरुद्ध ओबीसी अशा वातावरणात त्या जिंकून आणू शकतील का असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यातच विद्यमान भाजपच्या असणाऱ्या आमदाराचं तिकीट कापत तिथे पण प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देणं यासाठी भाजप आणि महायुती किती सकारात्मक राहते? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं की डॉक्टर प्रीतम मुंडे या विधानसभेच्या रिंगणात उतरतील ? उतरतील तर कोणत्या मतदारसंघातून उतरतील हे आपल्याला लवकर कळेल.